●केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ देणार. लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
●नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविणार. पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार.
●'डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन' योजनेस मुदतवाढ. योजना आणखी तीन जिल्ह्यात राबविणार.
राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्यातील शेतकर्यांना अवघ्या एक रूपयात पीक विम्याचा लाभ देणार्या योजनेला मंजुरी देण्यात आली असून नमो महासन्मान योजना देखील लागू झाली आहे.
राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातील निर्णयांची माहिती दिली. याप्रसंगी ते म्हणाले की, राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांची निधी देते. त्याच धर्तीवर राज्य सरकारही ६ हजार रुपये निधी देणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून एकूण १२ हजारांचा निधी शेतकर्यांना मिळणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा राज्यातील एक कोटी १५ लाख शेतकर्यांना फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेचा ज्या शेतकर्यांना लाभ मिळतोय त्याच शेतकर्यांना राज्य सरकारचा ही लाभ मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातील शेतकर्यांना आता एका रुपयात पीक विमा मिळणार असून त्यासाठी शेतकर्यांना एक रुपयात रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. या आधी राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी पंजाबराव देशमुख मिशन लागू होतं, आता ते संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आलं आहे. या योजनेचा फायदा राज्यातील १३ लाख शेतकर्यांना होणार आहे.