"भरडधान्याची बियाणं ही खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. ही संपत्ती शेतकऱ्यांना दिली जात आहे. या संपत्तीमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला अग्रेसर ठेवा", असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग, सिंधु आत्मनिर्भर अभियान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सिंधुदुर्ग भरडधान्य अभियानांतर्गत प्रात्यक्षिक प्रक्षेत्र लागवड व मोफत बियाणे वाटपाचा शुभारंभ पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते आज झाला. याप्रसंगी आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. चव्हाण आणि उपस्थितांच्या हस्ते अरुण कावले, शिवाजी रासम, दिप्ती सावंत, महेश संसारे, दयाळ अपराज, फटी गवस, सातु जाधव, महादेव सापळे, गोविंद केसरकर, प्रदीप सावंत, गितेश परब, देवकी कदम, नारायण गवस या शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात सात प्रकारच्या भरड धान्यांच्या बियाण्यांची रवळी देण्यात आली.
पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींजीच्या नेतृत्वाखालील भारताने जगाला सुचविले आणि जगाने मान्य करुन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जातेय. ही पिके आपल्या पूर्वजांची ठेव आहे. तिला वृध्दींगत करण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे. लागवडीनंतर पीक येईपर्यंत त्याची निगा कशी राखावयाची याचे मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करणार आहेत. शिवाय अधिकचे ज्ञान देण्याचे कामही या अभियानातून होणार आहे.
पूर्वजांची ही संपत्ती आपल्याकडे दिली जात आहे. त्यामध्ये अधिकाधिक क्षेत्र लागवडीखाली आणून भरड धान्याच्या उत्पादनात जिल्ह्याला अग्रेसर ठेवा, शेतकऱ्यांचे अधिकचे उत्पन्न मिळाले पाहीजे. त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. यासाठी प्रधानमंत्री मोदीजी सातत्याने शेतकऱ्यांपर्यंत विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहीजे, यासाठी किसान सन्मान योजनेतून 2-2 हजार असे 6 हजार रुपये देण्याचे काम केले आहे.
त्याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनानेही येणाऱ्या काळात 6 हजार रुपये देण्याचे काम सुरु केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा शेतकरी लाभार्थी व्हायला सुरुवात झाली, तर त्याला चाकरमानी होण्याची गरज नाही. पुढच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सरकारच्या प्रत्येक योजनांचे भागीदार व्हा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी शेवटी केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. राऊत यांनीही, बदलत्या जीवनशैलीबरोबरच आहारातही बदल झाला. भरड धान्यांच्या आहारातील महत्व आणि त्याची जनजागृती हाच उद्देश या अभियानाचा असल्याचे सांगितले. उल्लेखनीय काम करणाऱ्या कृषी सहायक रश्मी कुडाळकर, नाजुका पावडे, धंनजय कदम, चंद्रशेखर रेडकर, कृषी पर्यवेक्षक धनंजय गावडे, विस्तार अधिकारी (कृषी) एकनाथ सावंत आणि रांगोळीकार संजय गोसावी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात फोंडा घाट येथील भात संशोधन केंद्राचे डॉ.विजयकुमार शेटये यांचे, भरड धान्य आहारातील महत्व, लागवड व प्रक्रीया तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन झाले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार कलेली भरड धान्याचे महत्व वरील चित्राफितही प्रदर्शित केली.
स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाचे संदीप राणे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश जोशी यांनी केले. कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.