माणसानं अंतकरणातून उभे राहायला शिकलं पाहिजे. नरदेहाचा विचार करताना सामर्थ्य अंतःकरणात आहे. आणि प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात सामर्थ्य हे समान असते. त्या सामर्थ्याला आपण ओळखलं पाहिजे, असे मौलिक विचार सद्गुरू डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी व्यक्त केले. लाखो श्री सदस्यांच्या उपस्थितीत आज नवी मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
दरम्यान, महाराष्ट्र भूषण पुरस्कारमूर्ती आप्पासाहेब धर्माधिकारी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, हा माझ्या आयुष्यातल्या भाग्याचा क्षण आहे. कुठलाही पुरस्कार मोठाच असतो. हा कार्याचा गौरव आहे. नानासाहेबांनी जे कष्ट केले. श्री सदस्यांनी जे कष्ट केले, करतायेत, त्यांना याचं श्रेय जातं. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देणं, एका घरात दुसऱ्यांदा देणं हे पहिल्यांदाच होतंय. महान कौतुक आहे. खेड्यांतून काम सुरु केलं. त्यामुळं या कामाची प्रसिद्धी कधी केली नाही. प्रसिद्धीमुळे काही मिळत नाही. मानवता हा सगळ्यात महत्त्वाचा धर्म आहे. त्यासाठीच हा सगळाच खटाटोप आहे. अखेरच्या श्वासापर्यंत नानासाहेबांप्रमाणेच काम करेन, सचिनही उत्तराधिकारी म्हणून काम करत राहणार आहे. काम हे श्रेष्ठ आहे. काम जेव्हा उत्तम होतं, तेव्हा कौतुक होतं. कार्य श्रेष्ठ आहे म्हणून देहाचा सन्मान होतो. हा नानांना आणि तुम्हाला पुरस्कार अर्पण करतो, असं आप्पासाहेब म्हणाले.
काही दिवसांपूर्वी धर्माधिकारी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची रेवदंडा येथे घरी जाऊन भेट घेतली होती.
दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्राच्या माध्यमातून समाज घडविण्याचे काम धर्माधितकारी अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यानंतर आज त्यांच्या या कार्याचा गौरव महाराष्ट्र सरकारने केला. त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आज खारघर येथील सेंट्रल मैदानावर प्रचंड गर्दी झाली होती. या लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य सरकारमधील विविध खात्यांचे मंत्रीही उपस्थित होते. यावेळी अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा गौरव केला.