कॅलेंडरवर एप्रिल महिना उलटला की संपुर्ण कोकणात एक नवी चैत्रपालवी रुजते. खऱतर साधारणपणे हा महिना मराठी चैत्रसोहळ्याचा असतो. आणि याच भारलेल्या वातावरणात एप्रिलची दहा तारीख मात्र अवघ्या कोकणासाठी स्वताच्या जन्मदिवसानंतर आठवणीने लक्षात ठेवायचा तारिखसोहळा असतो. दहा एप्रिल म्हणजे कोकणच्या जगण्याला नवी पालवी देणारे, डोंगरदऱ्यावर विकासाची गंगा नेणारे, गावखेड्याला शहराला जोडणारे आमचं नेतृत्व म्हणजे कोकणचे भाग्यविधाते नारायण राणे यांचा जन्मदिवस..
लघु, सुक्ष्म आणि मध्यम या मंत्रिपदाच्या काळात दादांनी आज अवघ्या देशभरात राबत्या हाताला स्थैर्य दिले आहे. है स्थैर्य त्याला शाश्वत बनवले आहे. मुळात कष्टकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या सामान्य माणसांच्या कष्टाची जाणीव आहे, आणि त्या कष्टाला मिळणाऱ्या अशाश्वत मोबदल्याला आज स्थैर्य प्राप्त झालं आहे. गावखेड्याच्या पारंपारिक व्यवसायासोबत त्या व्यवसायाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारांचे एक नवे दालन निर्माण झालय. दादांच्या सोशल मिडियाला फॉलो करताना त्यातून संपूर्ण देशभर असलेल्या त्यांच्या कार्यविस्ताराचा परिघ आता जाणवू लागलाय.
1990 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असणारे नाव आता संपूर्ण भारताच्या राजकारणात सक्रिय झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, आणि भारतीय जनता पक्षाचे जे.पी.नडा साहेब यांनी दूरगामी विकासाच्या दूरदृष्टीवर दिलेली ती पोहोचपावती आहे. आज संपूर्ण देश आत्मनिर्भर होत असताना संपूर्ण देशातल्या कष्टकरी हाताना बळकटी देण्याचे काम करणाऱ्या सूक्ष्म लघु आणि मध्यम या अत्यंत मोठ्या खात्याची सूत्रे आदरणीय राणे साहेबांकडे सोपवण्यात आलीयत. या संधीचे आज सोने नाही तर प्लॅटेनियम होतेय.
दादांच्या निमित्ताने आज देश आज आपल्याला ओळखणाऱ्या एका माणसाच्या नेतृत्वात आघाडीवर जातोय हा विश्वास कोकणी माणसाला सुखावणार आहे. नारायण राणेंच्या राजकीय प्रवासात त्यांची काम करण्याची तडफ आणि लोकांसाठी वादळ अंगावर ओढून न्यायची तडफ आजही कायम आहे. आजपर्यंत दादा म्हणजे सिंधुदुर्ग हा विरोधकांनी पसरवलेला समज आज विरोधकांनाच दादा म्हणजे हिंदुस्थानाचे नेतृत्व हे मान्य करण्यापर्यंत गेलाय.
आज दादांचा वाढदिवस.. शरीरधर्माचे पालन म्हणून ‘वय’ हा शब्द आपणच आक्रसून ठेवलाय.. अथांग कार्याला, उत्तूंग स्वप्नाला आणि एका तेजोमय ध्यासाला वय ही मर्यादा थोडीच जखडून ठेवणार ? साधारणपणे नव्वदच्या दशकांपासून संपुर्ण कोकणच्या आपला दबदबा निर्माण करणा-या दादांनी गेल्या तीन दशकात स्वप्न ही उघड्या डोळ्यांनी पाहायची असतात, आणि ती कुठल्याही परिस्थीतीत पुर्णच करायची असतात याची जणू सवयच आपल्या राजकारणाला लावलीय.. प्रत्येक नव्या प्रोजेक्टसाठी मुठभर लोकांचा विरोध सहन करायचा, आणि आपल्या वज्रमुठीनं तो प्रकल्प पुर्ण करुन समोरच्या विरोधकांच्या वळलेल्या मुठींचा नमस्कारासाठी हात जोडून दाखवण्याचा चमत्कार, फक्त आणि फक्त दादांच करु शकतात हा आजही प्रत्येकाचा विश्वास आहे. केवळ गंगा आणायलाच नाही तर आणलेली गंगा ओळखायलाही भगीरथाची नजर लागते. आणि वास्तव हे नजरअंदाज करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी एकदिवस त्याची दखल घ्यावीच लागते हे मात्र निश्चित! असो...
नारायण राणे हे नाव केवळ राजकारणात अडकवून आपण नेहमी खूप मोठी चूक करतो.. हे नेतृत्व व्हिजनरी आहे.. आणि आपण व्हिजन आणि डीव्हीजनच्या गोंधळात अडकलोय.. आभाळ कवेत घेणारा हा नेता ज्याच्या त्याच्या संपर्कात आला त्याच्या ओंजळीत आभाळाचे दान देत गेला.. आज सर्वसामान्य चाकरमानी माणूस आपल्या नशिबाला कोसतो. त्या प्रत्येकाने एकदा , फक्त एकदा शिवसैनिक ते मुख्यमंत्री, मुख्यमंत्री ते विरोधी पक्षनेते, विरोधी पक्षनेते ते काँग्रेस, काँग्रेस ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष ते भाजप हा प्रवास का झाला तो एकदा समजून घ्या.. आज महाराष्ट्राच्या राजकारणाने गौरवलेला हा नेता देशाचे नेतृत्व करतोय़.. ही समाधानाची, अभिमानाची नाही तर आता राष्ट्रीयत्वाची भावना झालीय.
आज शिवसेना या प्रश्नांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना एक शिवसेना मात्र कायम आहे आणि ती म्हणजे नारायणरावांची शिवसेना.. होय आज शिवसेना अनेक नावात दुभंगलेली असताना एक नाव नसलेली कट्टर कार्यकर्त्य़ांची आणि अजुनही नारायण रावांना मानणाऱ्या शिवसेनेतल्या एका गटाची प्रचंड शक्ती आहे ती म्हणजे नारायणरावांची शिवसेना.. नारायण राणेंची शिवसेना म्हणजे शिस्त आणि संघटना याचे प्रतिक होते. आज मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर गेले त्याचे मेगा कव्हरेज अनेकांनी पाहिलेय. पण मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे काय आणि ती किती तेजस्वी असतो याची साक्ष आजही पंढरपूरची माय चंद्रभागा देईल. भल्या पहाटे सगळे प्रोटोकोल बाजूला ठेवत एकादशीला एकादशीच्या थेट चंद्रभागेत उतरुन अवघ्या यंत्रणेला एकादशी महात्म्य आचरणात पटवून देणारे मुख्यमंत्री दादासाहेब राणे यांनी त्या दिवशी महाराष्ट्राला खरे हिंदुत्व दाखवून दिले. भगव्यासाठी स्वताच्या आमदारकीला बाजू ठेवत अवघ्या किनारपट्टीला कवेत घेऊन यंत्रणेला न झुगारता जो लढवय्या बाणा दाखवला त्याला आम्ही हिदुत्व म्हणतो. मागच्या चार दशकातला गावखेड्यातला जत्रोत्सव मोठ्या दिमाखात होतोय त्या गावांना विकासाचे पाठबळ देणारा आमचा हा नेता आता राष्ट्रबांधणीच्या कामात अविरत झोकून देतोय याचा आम्हाला देशवासिय म्हणून गौरव आहे.
14एप्रिल 2005 ला पक्षाच्या बैठकीत पदांचा बाजार होतोय अस ठामपणे सांगत वाघाला आव्हान देणारा नेता असं म्हणत अनेकजण दादांचे वर्णन करतात. पण त्यावेळी आव्हानाची भाषा नव्हतीच मुळी त्यात होता तो टाहो, पक्षाला वाचवण्यासाठी एका कार्यकर्त्यानं फोडलेला.. पण तो व्यवस्थित दाबण्यात आला. शिवसेना ताब्यात घ्यायला निघालेलं नेतृत्व अशी प्रतिमा निर्माण करण्यात दादाविरोधकांना यश मिळालं.. आणि त्याच दिवशी एका कडवट कार्यकत्याला पक्ष मुकला.. त्यावेळच्या घडामोडी सर्वानाच माहित आहेत. मला त्याची पुनरावृत्ती नाही करायची. सागांयच फक्त एवढच आहे या नेत्याचा संघर्ष आजतागायत सुरु आहे. कार्य़कर्ता. पालकमंत्री, कॅबिनेटमंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, महसूलमंत्री आणि उद्योगमंत्री, खासदार आणि आता केंद्रीय मंत्रीपद अशा अनेक जबाबदा-या यशस्वीपणे निभावणं. गेल्या चार दशकाहून सलग सत्तेचा परिघ स्वताभोवती फिरत ठेवणं जे भल्याभल्या दिग्गज नेत्यांना जमली नाही ती कला फक्त दादांना जमलीय..
मुळात आज महाराष्ट्राचे राजकारण समजून घेतांना दादांचे प्रत्येक विधान हे त्यावेळी वेगळं वाटत असलं तरी आज सरकत्या काळाबरोबर खरं ठरतं हा इतिहास आहे. अनुभव आणि जनमानसांची तळमळ यातून दादांचे नेतृत्व आज हिंदुस्थानच्या नेतृत्वपदी विराजमान आहे. दादांचा प्रत्येक निर्णय कष्टकरी जगण्याला नवी आर्थिक समृद्धी देतोय. कधीकाळी कोकणापुरते सिमित करणाऱ्या आम्हा सर्वांच्या मानसिकतेला आता नव्या हिदुस्तानच्या नव्या क्षितीजाचा हा उद्यमी नारायण सुवर्ण झळाळी देवो याच जन्मदिनाच्या शुभेच्छा