ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे यांच्या संकल्पनेतून मुंबई आणि ठाणे कौटुंबिक न्यायालयाच्या सहकार्याने घटस्फोटाच्या निर्णयापासून परावृत्त होऊन आपल्या सहजीवनाची नव्याने सुरुवात केलेल्या जोडप्यांचा स्नेह मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर येथे दिनांक 2 एप्रिल रोजी संपन्न झाला. श्री सत्यरंजन धर्माधिकारी, न्यायमूर्ती ,मुंबई उच्च न्यायालय, श्री शाम रुकमे, न्यायाधीश , ठाणे कौटुंबिक न्यायालय, मानसशास्त्र अभ्यासक डॉ अंजली जोशी, नाट्य अभिनेते श्री प्रशांत दामले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अभिनेते प्रशांत दामले यांनी सहजीवन आनंदी होण्यासाठी जोडीदारांनी परस्परांशी कसे वागावे याच्या खुमासदार शैलीत काही टिप्स दिल्या. न्यायमूर्ती धर्माधिकारी साहेब यांनी सर्वोच्च न्यायालयातील केसलॉज च्या आधारे विवाह संस्था आणि त्याचे नियमन याचे महत्व विशद केले .न्यायाधीश श्री रुकमे साहेब यांनी कुटुंब न्यायालय हे घटस्फोटांचे न्यायालय नसून विभक्त होणाऱ्या कुटुंबांना एकत्र आणणारे न्यायालय आहे असे प्रतिपादन केले .
डॉक्टर अंजली जोशी यांनी यशस्वी सहजीवनाचे मंत्र सांगितले यामध्ये परस्परांशी सुसंवाद करणे,एकमेकांना समजून घेणे, झालेल्या चुकांबद्दल जोडीदाराला माफ करणे ,आपल्या भावनांची जबाबदारी आपण स्वतः घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात उपस्थित काही जोडप्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवर आणि जोडप्यांनी आपल्या मनोगतात कौटुंबिक न्यायालयातील विवाह समुपदेशकांच्या कार्याचा गौरव केला. जोडप्यांनी आपल्याला समुपदेशनामुळे घटस्फोटाचा निर्णय बदलण्यास कशी मदत झाली हे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक मराठे यांनी केले. आभार वंदना शिंदे यांनी मानले.