महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. दिलीप पांढरपट्‌टे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी अमरावती विभागाचे माजी विभागीय आयुक्त डॉ. दिलीप ज्ञानेश्वर पांढरपट्‌टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल यांनी ही नियुक्ती केली आहे. नवनियुक्त सदस्य डॉ. पांढरपट्‌टे यांना आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.

डॉ. पांढरपट्‌टे हे १९८७ च्या राज्य सेवा तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी उपजिल्हाधिकारी, उपायुक्त म्हणून कोकण भवनसह कोकणात सेवा बजावली आहे. सन २००० मध्ये त्यांना अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती मिळाली. सन २०१५ मध्ये त्यांची भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्यात आली. सिंधुदुर्ग, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे व सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव, अमरावती विभागाचे आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

 डॉ. पांढरपट्‌टे यांनी प्रशासकीय सेवेत राहून साहित्यिक सेवा बजावली आहे. त्यांनी उर्दू भाषेचे ज्ञान आत्मसात केले आहे. ‘गझल’ हा त्यांचा आवडता काव्य प्रकार आहे. त्यांची विविध विषयांवरील दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.