यंदा श्रावण अधिकमास, नवे मराठी वर्ष 13 महिन्यांचे


 २२ मार्च रोजी श्रीशालिवाहन शके १९४५ शोभननाम नाम संवत्सराचा प्रारंभ झाला आहे. या नवीन संवत्सरात श्रावण महिना अधिक असल्याने हे वर्ष १३ महिन्यांचे असणार आहे. गुढीपाडव्याच्याच दिवशी भारतीय राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ झाला आहे.

 नूतन शालिवाहन शक १९४५ हे संवत्सर २२ मार्च २०२३ पासून ८ एप्रिल २०२४ पर्यंत असणार आहे. या नूतन संवत्सरामध्ये १८ जुलै २०२३ ते १६. ऑगस्ट २०२३ श्रावण -अधिकमास आलेला आहे. त्यामुळे नागपंचमी, श्रीकृष्ण जयंती, गणेशचतुर्थी, नवरात्र, विजया दशमी, दीपावली हे सण १९ दिवस उशीरा येणार आहेत. 

ठराविक सण हे ठराविक ऋतूंमध्ये यावेत यासाठी भारतीय पंचांगे ही चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेली आहेत.. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असतांना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणतात. कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो, त्यावेळी पहिला तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास समजला जातो. 

या नूतन वर्षी कर्क राशीत सूर्य असतांना १८ जुलै रोजी आणि १७ ऑगस्ट रोजी अशा दोन चांद्रमासांचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे अधिक श्रावण आणि निजश्रावण असे दोन श्रावणमास आले आहेत

या नूतन शालिवाहन शक वर्षामध्ये ३५० वा शिवराज्याभिषेकोत्सव दिन येत आहे. २ जून रोजी शिवराज शक ३५० चा प्रारंभ होत आहे. शालिवाहन शके १९४५ या नूतन वर्षामध्ये एकही अंगारकी संकष्ट चतुर्थी येत नाही. सोने खरेदीसाठी सहा गुरुपुष्यामृत योग येणार आहेत. या नूतन संवत्सरामध्ये भरपूर विवाहमुहूर्त आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.