महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना न्या. चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्थेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांना स्पर्श केला. यावेळी निकालपत्राच्या भाषेबाबत सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारी गोष्ट न्यायमूर्तीने यावेळी बोलून दाखवलीय. "सर्वोच्च न्यायालयाचे निकाल भारतीय भाषांत उपलब्ध व्हायला हवेत. जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. अन्यथा ९९ टक्के लोकांपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे काम पोहचणार नाही."
न्यायालयातील सुनावणी प्रत्येकाला समजली पाहिजे, ही जबाबदारी बार कौन्सिलची आहे. न्यायालय आणि वकील काय काम करतात ते ९९ टक्के लोकांपर्यंत पोहोचतच नाही. यानंतरचा आपला पुढचा टप्पा सर्वोच्च न्यायालयाची सर्व निकालपत्रे सगळ्या भारतीय भाषांत उपलब्ध करून देण्याचा असायला हवा. तंत्रज्ञानाच्या मदतीने हे साध्य करता येईल, असेही न्या. चंद्रचूड म्हणाले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निकाल सर्व भारतीय भाषांत उपलब्ध होतील या दिशेने काम करण्याचे आवाहन सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी रविवारी केले. न्या. चंद्रचूड यांच्या या सूचनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले असून याचा देशातील अनेकांना खास करून तरुणांना फायदा होईल असे म्हटले आहे.