विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात तणावमुक्त राहावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' या विषयावर थेट संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रत्येक शाळेत थेट प्रसारण करावयाचे असून, शिक्षण विभागाने त्याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहेत. केसरकर यांनी सकाळी बालभवन, मुंबई येथून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त आणि शिक्षण विभागाच्या अधिकार्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाच्या पृष्ठभूमीवर राज्यात 25 जानेवारी रोजी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. या स्पर्धेचेही नियोजन शिक्षण विभागाने करून जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील, यासाठी प्रयत्न करावे. या चित्रकला स्पर्धेसाठी विविध दहा विषय असतील. या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांसह दहा उत्तेजनार्थ व 25 इतर विशेष बक्षीसे देण्यात येतील. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकांनाही निमंत्रित करावे, असेही त्यांनी सांगितले.