पिकासो ही सिंधुदुर्गच्या लोकसंस्कृतीवर आधारीत चित्रकृती दिल्यानंतर अभिजित वारंग पिकोलो ही सांगीतिक आणि भावनिक कलाकृती मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रेम प्रथा धुमशानच्या यशानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विलोभनीय रूप मोठ्या पडद्यावर खुलणार आहे.
पिकोलो ही एक संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करत आपली कला कशी जिवंत ठेवतो व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो, हे 'पिकोलो'मध्ये पाहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे.
२६ जानेवारी रोजी 'पिकोलो' चित्रपट प्रेक्षकांच्या येणार आहे. फोर्टीगो मोशन पिक्चर प्रा. लि प्रस्तुत आणि अभिजित मोहन वारंग दिग्दर्शित 'पिकोलो' चित्रपटाची निर्मिती राजेश मुद्दापूर यांनी केली आहे.
पिकोलो या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून या दोघांसोबत किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव आदी कलाकार काम करीत आहेत.