बाळासाहेब : मालवणी माणसाचा आधारवड


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.हिंदुत्वाचा प्रखर अंगार आणि मराठीपणाचा अखंड पेटलेला वणवा.. आणि याच प्रखरतेतून निर्माण झाली शिवसेना नावाची ओजस्वी विचारगाथा. आज वर्तमानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मरण करताना साहेब , सिंधुदुर्ग, आणि मुंबईतील मालवणी माणूस या सर्वांचा सर्वंकष विचार करण्याची गरज आहे.


राजकारण म्हणजे समाजकारण, आणि समाजकारणासाठी राजकारणाची गरज या एकाच तत्वाने मुंबईत निर्माण झालेला झंझावात अवघ्या मराठी मनात ललकारु लागला आणि जन्म झाला शिवसेना या चार अक्षरी मंत्राचा! आणि याच मंत्राचा जागर करत चाकरमानी मालवणी माणूस शिवसेना हा पक्ष नाही तर घरचे कार्य समजत शिवसैनिक बनला. आणि याच शिवसैनिकांनी नोकरदार , चाकरदार हा कनिष्ठ दर्जा झुगारत मी माझ्या मुंबईचा रक्षक म्हणत त्याने शिवसेनेच्या शाखेला गडकोट बनवले


प्रत्येक मराठी मनात धुमसत असलेला रौद्राचा ज्वालामुखी शिवसेनेमुळे लाव्हा बनून धमन्यातुन स्त्रवू लागला. जिथं अन्याय तिथं मुठी वळू लागल्या आणि जिथ एकटेपणा तिथे शिवसेना नावाचा पंजा जगण्याचं बळ देऊ लागला. एक धगधगत्या विचाराने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना हा विचार महाराष्ट्राला दिला.आणि या सगळ्यात खरा आधार मिळाला तो गिरणी कामगार अशी ओळख शोधणा-या मालवणी माणसाला. 


सत्तर एशींच्या दशकात भाऊच्या धक्क्यावरुन कोकणी माणूस या मुंबईत स्वताचे एक स्थान शोधत होता. भोंग्यात जगणं हरवलेल्या कोकणी माणसाला शिवसेनेंन आत्मविश्वास दिला आणि त्याच कोकणी माणसाने शिवसैनिक बनून गगनभेदी आरोळी ठोकली, अरे, आवाज कोणाचा.. शिवसेनेचा !!


शिवसेनेच्या सुरुवातीच्या दिवसात चाकरमानी असणारा मुंबईकर गावी जाताना आठवणीने शिवसेनेचा भगवा घेऊन जाऊ लागला.. आणि मग गावागावात शिवसेनेची शाखा उघडू लागली.. प्रस्थापित राजकिय व्यवस्थेविरुद्ध लढताना ओळख नसणा-या चेह-यांना शिवसेनेने शिवसैनिक ही एक जबरदस्त ओळख दिली. आणि प्रत्येक मनाच्या गाभा-यात ग्रामदैवताबरोबरच शिवसेनाप्रमुख नावाचे दैवत पुजलं जाऊ लागले.


कोकणवासियांनी शिवसेनेवर आणि शिवसेनाप्रमुखांनी कोकणवर अपार प्रेम केलं. शिवसेनेचा भगवा विधानसभेवर फडकला तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा पहिला मान शिवसेनाप्रमुखांनी दिला तो कोकणलाच.. कोकणच्या लाल तांबड्या मातीवर बाळासाहेंबानी प्रचंड प्रेम केलं. याच कोकणच्या मातीवर भाबड्या माणसांवर बाळासाहेंबांनी अपार प्रेम केलं. आणि म्हणूनच कोकणच्या हिरव्यागार निसर्गाने शिवसेनाप्रमुखांनी गावागावात भगवा दिमाखात मिरवला.


शिवसेनाप्रमुखांचे आणि इथल्या निसर्गाचे एक अनुपम्य नातं होत. कोकणच्या सागराची गाज त्यांना एक उर्जा द्यायची.. इथला हा बेभान वारा शिवसेनाप्रमुख नावाचे वादळ पाहिलं की त्याचीही झुळूक व्हायची.. आणि इथली लाल ताबंडी माती शिवसेनाप्रमुखांचे शब्द ऐकताना भगवी व्हायची.



बाळासाहेबांनी कोकणवासियांकडे केवळ मतदार म्हणून पाहिलच नाही.. हे कोकण माझं आहे.. ही माणसं माझी आहेत असं सागंणारे शिवसेनाप्रमुख याच लाडक्या कोकणासमोर नतमस्तकही झाले होते..
खरतर आज शिवसेना अवघ्या देशभरात पसरलीय. पण मालवणी माणसाशी आणि शिवसेनाप्रमुखांचे एक वेगळच नातं होतं.. हे नातं वर्षानुवर्ष असच जपलं जाईल.. याच कोकणच्या कणाकणाला बांधलेल्या शिवबंधनासारखं... 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पवित्र स्मृतीस सिंधुदुर्ग360 कडून विनम्र अभिवादन ! 

© sindhudurg360

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.