"मी स्वतःला भाग्यशाली समजतो की ही जी 20 ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि त्याचे उद्घाटन माझ्या हाताने झाले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धनयवाद देतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. जगातील शहरातील विकास कसा होईल याच्यावर ही परिषद आहे. पुणे, मुंबई, नागपूर ही शहरं जगात आकर्षण ठरत आहेत." अशा शब्दात मनोगत व्यक्त करत केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जी 20 परिषदेच्या पुणे बैठकीचे आज उदघाटन केले.
संपूर्ण भारताचे लक्ष लागलेल्या जी 20 परिषदेला आजपासून सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. आजपासून इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप (IWG) ची दोन दिवसीय बैठक आजपासून पार पडणार आहे.
या बैठकीत सहभागी होणारे देश आणि संस्था पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर विचारमंथन करतील. IWG सदस्य राष्ट्रे, अतिथी राष्ट्रे आणि भारताने आमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे ६५ प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. यादरम्यान ते भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली २०२३ च्या पायाभूत सुविधांच्या अजेंडावर चर्चा करतील.
यावेळी बोलताना राणे राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत यावर देखील नारायण राणे यांनी भाष्य केले. "कोणतेही उद्योग बाहेर जात नाही आहेत. या मिस गाईड करणाऱ्या बातम्या आहेत. जे राज्य करात सवलत देतात. तिथे बाहेरच्या कंपन्या येऊन गुंतवणूक करतात. देशाच्या इतर भागापेक्षा जागेचे दर महाराष्ट्रात महाग आहेत. त्यामुळे उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जातात पण ते परत येतात. माझ्या जवळ सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रिपद आहे. उद्योग महाराष्ट्रात आणण्याकरीता केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. असेही नारायण राणे यांनी सांगितले.
- सिंधुदुर्ग 360°