वर्ल्ड इकॉनोमिक फोरमसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 16 ते 20 जानेवारी दावोसला जाणार आहेत. या वर्ल्ड इकॉनॉमी फोरम मधून राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. चार दिवसाच्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोसला रवाना होणार आहेत.
● मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री महाराष्ट्रात आणणार गुंतवणूक
दावोस परिषदेत मुख्यमंत्र्यासमवेत राज्यातील मंत्री आणि अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जाणार आहे. औद्योगिक मंत्री उदय सामंत हे देखील दावोसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सामील होणार आहेत. उदय सामंत दावोसला रवाना होणार आहेत.
नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. 'मॅग्नेटिक महाराष्ट्रा'ची नवी बलस्थाने संपूर्ण जगाला कळून राज्याकडे जगाचा ओढा कसा वाढेल यावर या परिषदेत लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा व इतर महत्त्वाच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी जगभरातील मान्यवर, गुंतवणूकदार, तसेच उद्योगांच्या प्रमुखांशीही मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत.
● समजून घ्या काय आहे दावोस परिषद ?
जागतिक आर्थिक परिषद (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) ही एक खाजगी संस्था आहे. तीची स्थापना १९७१ साली करण्यात आली होती. या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंडची राजधानी जिनेव्हामध्ये आहे. या संस्थेला आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून मान्यता मिळालेली आहे. या संस्थेचे ध्येय जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून जागतिक क्षेत्रिय आणि औद्योगिक विकासाला चालना देणे आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम निमंत्रण देण्यात आलेल्यांना यामध्ये सहभागी होता येते. या परिषदेत जवळपास २५०० व्यक्ती सहभाग घेतात. त्यात जगभरातील मोठे उद्योगपती, व्यावसायिक आणि अर्थशास्त्रज्ञ यांचा समावेश असतो.
● अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीगाठी आणि संवाद
१६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. हे सुसज्ज आणि आकर्षक दालन डाव्होस येथे प्रमुख ठिकाणी आणि भारत सरकारच्या दालनासमोर असेल. या परिषदेत महत्त्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करार केले जातील. जागतिक आर्थिक परिषदेच्या न्यू इकॉनॉमी अँड सोसायटी या केंद्राचे तसेच अर्बन ट्रान्सफॉरमेशनचे प्रमुख देखील मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. तर १७ जानेवारी रोजी लक्झमबर्गचे पंतप्रधान, जॉर्डनचे पंतप्रधान, सिंगापूरचे माहिती व दूरसंचार मंत्री, जपान बँक, सौदी अरबचे उद्योग व खनिकर्म मंत्री, स्विस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी होणार आहेत. विविध क्षेत्रातील नामवंत उद्योगांसमवेत सामंजस्य करारही करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शिंदे यांचे कॉँग्रेस सेंटर येथे भाषण होणार आहे. बदलत्या पर्यावरणाचे शहरांच्या विकासापुढील आव्हान आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकास यावर शिंदे आपले विचार मांडणार आहेत. तर रात्री महाराष्ट्राच्या वतीने स्नेहभोजन आयोजित करण्यात आले असून यासाठी केंद्रीय मंत्री तसेच उद्योग, राजकीय, तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी खास महाराष्ट्रीय भोजनाचा बेत असेल
● दावोस परिषदेत महाराष्ट्र दालनाची उत्सुकता
संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या या परिषदेत राज्याच्या दालनात महाराष्ट्राच्या प्रगतीचे अत्याधुनिक पद्धतीने आणि प्रभावी असे प्रदर्शन केले जाणार आहे. त्यात मेट्रो, सागरी किनारा मार्ग, शिवडी- नाव्हाशेवा पारबंदर प्रकल्प, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच इलेक्ट्रिक वाहनांचा सार्वजनिक वाहतुकीत करण्यात येत असलेला उपयोग, पर्यावरण संरक्षणासाठी उचलण्यात आलेली पाऊले अशा अनेक बाबी दाखविण्यात येणार आहेत.