●14 जानेवारी रोजी मुंबई साहित्य संघात पुरस्काराचे वितरण
●सिने नाट्य अभिनेते नागेश मोरवेकर यांच्या हस्ते होणार प्रकाश जाधव यांचा सन्मान
सिंधुदुर्ग सुपुत्र आणि मराठीतील ख्यातनाम लेखक चंद्रकांत खोत यांच्या स्मृती प्रित्यर्थ यावर्षीपासून देण्यात येणाऱ्या चंद्रकांत खोत स्मृती साहित्य पुरस्कारासाठी कोकणातील प्रसिद्ध कवी प्रकाश ग जाधव यांची निवड करण्यात आली आहे. गेली ३६ वर्षे प्रकाश ग. जाधव हे एकता कल्चरल अकादमीच्या माध्यमातून राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीत सक्रीय आहेत. संदर्भहिन फुलांच्या कविता, क्षितीज हरवलेल्या शहरात, अस्वस्थ काळजावरचं मोरपिस, मनाच्या तळघरातला प्रकाश, आयुष्याला पुरेल इतकं या कविता संग्रहांसह त्यांचे अन्य चार प्रातिनिधीक काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. एकता महोत्सवात कवी जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सत्कार प्रसंगी 5,555 रुपये स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराने 14 जानेवारी रोजी मुंबई गिरगाव साहित्य संघात होणाऱ्या एकता कल्चर महोत्सवात सिने नाट्य अभिनेते नागेश मोरवेकर यांच्या हस्ते कवी जाधव यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत खोत मित्र परिवारातील डॉ रमेश यादव यांनी दिली.
चंद्रकांत खोत म्हणजे एक भन्नाट व्यक्तिमत्व. लेखक म्हणून जेवढे मोठे तेवढेच परखड वक्तव्यासाठीही प्रसिद्ध. त्यांचा 'मर्तक' काव्यसंग्रह बहुचर्चित ठरलाच पण 'अ ब क ड ई' दिवाळी अंकाने मराठी साहित्यात इतिहास निर्माण केला. आता त्यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र हिंदी साहित्यातील ज्येष्ठ कवी आणि अनुवादक डॉ. रमेश यादव आणि त्यांच्या मित्र परिवारातर्फे चंद्रकांत खोत स्मृती पुरस्कार सुरू करण्यात आला. यावर्षीच्या या पहिल्याच पुरस्कारासाठी कवी जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.
- सिंधुदुर्ग360°