साहित्य अकादमीच्या यंदाच्या साहित्य पुरस्कारासाठी प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीची निवड करण्यात आली. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून अकादमीच्या सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अस्सल सिंधुदुर्गच्या मातीतील साहित्यिक अशी ओळख असणाऱ्या प्रवीण बांदेकर यांनी चाळेगत या कादंबरी नंतर २०१४ मध्ये 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' ही कादंबरी लिहायला घेतली. आणि २०१६ मध्ये ते पूर्ण केले. त्यानंतर ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस याच्या हस्ते सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर येथे याचे प्रकाशनही झाले होते. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी त्याला सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे.
विलक्षण कथानकाची 'उजव्या सोंडेची बाहुल्या'
शब्द प्रकाशनतर्फे २०१६ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखा परशा ठाकर याच्या घराण्यात बाहुल्यांच्या खेळाची कला आहे. तो प्राध्यापक असला तरी आपला हा वारसा धरून आहे. प्रबोधनासाठी तो बाहुल्यांचे खेळ स्वतः लिहून करतो. एके दिवशी तो अचानक गायब होतो. आणि त्याचा शोध घेण्याच्या निमित्ताने अनेक घटनांचा, दृश्यांचा, आठवणींचा विशाल पट उलगडत जातो. माळ्यावरच्या बाहुल्या मोकळ्या केल्या जातात. त्याबद्दलच्या संगणकावरच्या नोंदी तपासल्या जातात. आणि बाहुल्यांतल्या माणसांचा एक चित्तचक्षुचमत्कारिक खेळ वेगाने घडत जातो...