कोकणच्या राजकारणाचा युवा आणि आश्वासक चेहरा म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे पाहिले जाते. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रश्न संसदेत मांडून त्यांची अंमलबजावणी करणे असो किंवा आज वास्तवात दिसणाऱ्या कोकण रेल्वेच्या अनेक प्रश्नांबाबत निलेश राणे यांची भूमिका आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरली आहे. कोकणच्या विकासासाठी आज आवश्यक असणारी कोकण पॅकेजच्या मागणीला निलेश राणे यांनी वाचा फोडली आहे. भाजप नेते निलेश राणे यांच्या मागणीनंतर आता प्रशासनही कामाला लागल्याची माहिती मिळतेय. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि भाजप नेते निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरची कोकण पॅकेजची घोषणा होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कोकणचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी 10 ते 12 हजार कोटींचे कोकण पॅकेज जाहिर करावे, अशी महत्वाची मागणी भाजपाचे नेते माजी निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ प्रतिसाद देत कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सकारात्मक असल्याचे आश्वासित केले. त्यामुळेच राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात कोकण पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता वाढलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यामध्ये माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांची भेट घेतली. तर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रत्नागिरीसाठी घेतलेल्या आढावा बैठकीला सुद्धा निलेश राणे उपस्थित होते. यावेळी कोकण विकासाचे महत्वाचे मुद्दे निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.
कोकणाचा विकास हा इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार देऊन होणार आहे. त्यासाठी नव्या उद्योग, व्यवसायांना या भूमीवर चालना दिली पाहिजेच. तर येथील पर्यटन व्यवसायाला नवी चालना देणे गरजेचे आहे. या पर्यटन व्यवसायाला शासनाने नवी चेतना दिली तर युवकांना स्वयंरोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे.
एकीकडे उद्योग, पर्यटन व्यवसायाला चालना देतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते मजबुतीकरण हाही महत्वाचा विषय निलेश राणे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर मांडला. दळण-वळणाचे मजबूत जाळे ही कोणत्याही मूलभूत विकासाची गरज आहे. याही दृष्टीने जिल्ह्यातील उत्तम रस्ते पाणी, बंधारे अशा पायाभूत विकासासाठी राज्य शासनाने कोकणासाठी भरीव तरतूद करावी, अशी मागणी निलेश राणे यांनी केली.
आपण कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक असून कोकणासाठी भरीव तरतूद करण्याच्या दृष्टीने नक्कीच लवकरत लवकर निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी निलेश राणे यांना आश्वासित केले. पालकमंत्री उदय सामंत यांनीही निलेश राणे यांच्या मागणीकडे सकारात्मक प्रतिसाद दिला.
सिंधुदुर्ग 360°