2023 हे वर्ष तंत्रज्ञान जगतात एक मोठी क्रांती घडवणारे ठरणार आहे. आणि त्याला कारणीभूत ठरणार आहे ते म्हणजे chatGPT हे नवीन माहितीचे महाआंतरजाल! आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च फर्म OpenAI चे ChatGPT ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.
आधी कोणतीही माहिती शोधण्यासाठी आपल्याकडे गुगल हा एक पर्याय होता. पण गुगल कडून आपल्याला फक्त माहितीचा स्रोत मिळत होता. पण तीच माहिती आपल्याला हव्या त्या प्रकारात मिळ शकणार आहे. म्हणजे, तुम्हाला एका ठराविक विषयाची माहिती घेऊन त्याचं एका लेखात रूपांतर करायचंय किंवा तुम्हाला तुमच्या बॉसला सुट्टीसाठी भला मोठा मेल लिहण्यासाठी एका खास टूलची निर्मिती करण्यात आली आहे. त्या तंत्रज्ञानाचे नाव आहे ‘चॅटजीपीटी’. याचा वापर करून तुम्ही अगदी काही क्षणात हवा तो लेख आणि तुमच्या बॉससाठी सुट्टीचा मेल लिहू शकता.
ChatGPT हे एक AI-समर्थित चॅटबॉट आहे ज्यामध्ये संभाषणात्मक पद्धतीने प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता आहे. चॅटजीपीटीचा वापर विद्यार्थी सोप्या शब्दात जटिल प्रश्न सोडवण्यासाठीचे तंत्र असा करू शकतात. तसेच इंग्रजीमध्ये सोप्या प्रश्नांची उत्तरे देण्याव्यतिरिक्त, चॅटबॉटमध्ये कोडचे पुनरावलोकन करण्याची आणि लिहिण्याची क्षमता देखील आहे, ज्यामुळे अभियंते आणि कोडर यांच्या भविष्याविषयी अंदाज बांधला जातो.
ChatGPT कसा वापर कराल
https://chat.openai.com/chat या वेबसाईटवर जाऊन सर्वात आधी तुम्हाला तुमचं खातं उघडावं लागेल. त्यानंतर पुन्हा लॉगिन केल्यानंतर तुम्हाला याचा वापर कसा करावा याच्या काही सूचना दिसतील आणि नंतर खाली एक पट्टी दिसेल ज्यात तुम्ही या चॅटबॉटला हवे ते प्रश्न विचारू शकता. यामध्ये तुम्ही कोणत्याही विषयावरील प्रश्न विचारून त्याची उत्तरे मिळवू शकता.
कोणत्याही ठराविक विषयावरील प्रश्न विचारून हवी ती माहिती तुम्ही मिळवू शकता. एखाद्या आजारावर काय उपाय करावे, कोणती काळजी घ्यावी, ठराविक विषयावर लेख कसा लिहावा, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची संपूर्ण माहिती तुम्हाला क्षणांत मिळू शकते ती सुद्धा एकाच ठिकाणी. एखादी छोटी गोष्ट असेल किंवा लहानसा विनोद सुद्दा हा चॅटबॉट तुम्हाला सांगू शकतो, एवढंच काय एखादी सुंदर कवितासुद्धा हा चॅटबॉट तुम्हाला लिहून देऊ शकतो.