गणेशोत्सवाची लगबग वाढू लागलीय. संपूर्ण विश्वात जरी गणेशोत्सव साजरा होत असला तरी कोकणात मात्र गणेशोत्सव हेच जग असते. मुळात कलावंताचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री गजाननाच्या या उत्सवात कोकणी माणसाची लगबग ही अनुभवण्यासारखी असते याच मनस्थितीचे वर्णन करणाऱ्या या दोन कविता सोशल मीडियावर प्रचंड गाजतायत.
दोन कविताच्या माध्यमातून कोकणच्या गणेशोत्सवाची दोन रूपे उलगडण्यात आलीय. पहिली कविता कोकणचे निसर्गकवी म्हणून ज्यांची ओळख आहे त्या विनय सौदागर यांची. विनय सौदागर यांच्या लेखणीतून उतरलेली 'गणपतीसाठी भजन' ही कविता कोकणातल्या आजच्या भजन परंपरेची गजाल सांगणारी आहे.
गणपतीसाठी भजन
तेच टाळ, तीच झांज
तरी काय जमणा नाय
आसनार तो बसल्या शिवाय
भजन आमचा रंगणा नाय ॥
पन्नास दिले पेटयेसाठी
धा खपयले मुरदंगाक
नाश्ट्याक काय हिशेब नाय
चाल बसाना अभंगाक
तिच चटय, तिच वळय
तरी बैठक बसणा नाय
आसनार तो बसल्या शिवाय
भजन आमचा रंगणा नाय॥
कडेकडेन पोरगी हत
भितीक टेकले जुने जांते
लोट्यार थोडो किचाट हा
आसव बापडे पोर न्हान ते
तिच उसळ, तिच च्या
गळो काय सुटणा नाय
आसनार तो बसल्या शिवाय
भजन आमचा रंगणा नाय॥
तूच शीव, तूच जीव
चवथे दिसा नाता जुळय
सगळ्या मायेत ब्रम्ह खयचा
हुंदरामार्फत माका कळय
खूप दिसानी परसादाची
तुझ्यासमोर पंगत लाय
आसनार तू बसशित रे
गवळण त्येवा तुयाच लाय॥॥
विनय सौदागर, आजगाव - सावंतवाडी.
दुसरी कविता आहे जयंत रेवडेकर यांची 'चल सायबा' . कोकणचा गणेशोत्सव हा गावचा सणउत्सव असला तरी वर्षभर मुंबईकर चाकरमानी या उत्सवासाठी आतुर असतो. महागाई, सुट्टी, नोकरी या सारख्या अनेक गर्तेतही चाकरमानी चक्रव्यूह भेदून गावी उत्सवासाठी जातोच. नोकरदार वर्गाची सणाबद्दलची ही आत्मीयता मांडणारी जयंत रेवडेकर यांची ही कविता मनाला स्पर्शून जाते.
चल सायबा
चल सायबा कोकणात आमच्या
माझो देव दाखवतय तुका
सुटी देवचस नाय पंधरा दिवस
त्या परास घेवनच जातय तुका...
दर वरसाची नाटका तुझी
रजा देताना टाळाटाळ
देवाक जाताना कशाक मेल्या
तोंडातना काढतस गाळ
येवन बघ जावचस नाय
गॅरंटेन ह्या सांगतय तुका
सुटी देवचस नाय पंधरा दिवस
त्या परास घेवनच जातय तुका...
घर झाडना रंग काढना
कामा कितकी तुका काय
आये बाबा थकले हत
तेंका आता जमना नाय
तोरणा लायटींग सजावट
एकट्याक कसा जमात माका
सुटी देवचस नाय पंधरा दिवस
त्या परास घेवनच जातय तुका...
बशीची तिकटा भलतीच वाढली
रेलवेचा तिकीट कन्फर्म नाय
तरी सूदा म्हणतस कसो
इतक्या लवकर गावाक काय?
दिवा गाडयेत उभ्यान जावचो
अनुभव सायबा नसात तुका
सुटी देवचस नाय पंधरा दिवस
त्या परास घेवनच जातय तुका...
भजना आरते रातभर जागराण
रोज गोडधोडाचा पंच पकवान
अकरा दिवस घरात गणपती
घराचा देऊळ होता माझ्या
गणपतीक गावाक जातलयच
आधीच सांगान ठेवतय तुका
सुटी देवचस नाय पंधरा दिवस
त्या परास घेवनच जातय तुका...
- जयंत रेवडेकर
Sundar kavita
ReplyDelete❤❤
ReplyDelete