सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018’ जाहिर केले आहे.
या स्टार्टअप धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्टअप विकासकरिता नवोदित उद्योजकांच्या कल्पनांना पोषक वातावरण निर्मिती करुन त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरिता इनक्युबेटर्सची स्थापना व विस्तार, गुणवत्ता, परिक्षण स्टार्टअपना बौध्दिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रँड चॅलेंज, स्टार्टअप वीक यासारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत स्टार्टअप यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिनांक 27 ऑगस्ट 2022 रोजी वैभववाडी, 29 ऑगस्ट 2022 रोजी देवगड, मालवण,कणकवली, कुडाळ 30 ऑगस्ट 2022 रोजी सावंतवाडी, 1 सप्टेंबर 2022 रोजी दोडामार्ग अशाप्रकारे सर्व तालुक्यामध्ये येणार आहे. दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सहभागी स्टार्टअप सादरीकरण सत्र तालुकानिहाय होणार आहे.
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेची ठळक वैशिष्टे:-
महाराष्ट्रातील तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यनपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. नवसंकल्पनाना तसेच सुरुवातीच्या टप्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे. राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे. महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण कल्पना असणारे सर्व नागरिक या यात्रेत सहभागी होण्यास पात्र असतील.
प्रत्येक जिल्हयामधून अव्वल 3 विजेते घोषित केले जाणार आहेत यामध्ये रु 10,000/- ते 1,00,000 पर्यंतचे पारितोषिक रक्कम अदा करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व क्षेत्रांचा(sector) समावेश असेल उदा. कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास(sustainability),smart Infrastructure &mobility), इ. प्रशासन आणि इतर कुठलाही उपाय अथवा समाधान जो नाविन्यपूर्ण आहे इत्यादी.
राज्यस्तरीय विजेत्यांना रोख अनुदान तसेच इनक्युबेशन सहाय्य, बीज भांडवल निधीसाठी सहाय, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींची मार्गदर्शन सत्रे तसेच सॉप्टवेअर क्रेडीटस, क्लाऊड केडीटस,क्लाऊड क्रेडीटस सारखे इतर लाभ पुरविण्यात येतील.
त्या अनुषंगाने वरील नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योग सादरीकरण करण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांनी व उद्योजकांनी आपल्या उद्योगाबाबतचे अर्ज आपल्या नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण संस्थेमध्ये सादर करावीत.
अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग फोन नंबर 02362 228835 अथवा नामदेव सावंत 9403350689 यांचेशी संपर्क साधावा.
यात्रेत जिल्ह्यातून जास्तीत जास्त नवउद्योजक, विद्यार्थी व नाविन्यता परिसंस्था यांनी सहभाग घेवून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, प्र.सहायक आयुक्त, इनुजा शेख यांनी केले आहे.