आषाढ महिन्याच्या पौर्णिमेपासून म्हणजे गुरूपौर्णिमेपासून राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि बिहार येथे श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे परंतू महाराष्ट्रात म्हणजेच पश्चिम आणि दक्षिण भारतात शुक्रवार २९ जुलै २०२२ पासून श्रावण मासारंभ होत आहे. हिंदू पंचागांतील श्रावण हा पाचवा महिना आहे. हा निसर्गरम्य वातावरणासाठी देखील ओळखला जातो. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहेत. मात्र, यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. विशेषत: श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे म्हणतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.
● श्रावणाचे महत्व.
श्रावण महिना महादेव शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते, असे सांगितले जाते. श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व असते. शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. तसेच श्रावणात शिव प्रतीकांपैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते.
●यावेळी ४ श्रावण सोमवार.
सन २०२२ मध्ये २९ जुलै रोजी श्रावण मासारंभ होत आहे. पहिला श्रावणी सोमवार ०१ ऑगस्ट २०२२ रोजी आहे. यानंतर ०८ ऑगस्ट २०२२ रोजी दुसरा श्रावणी सोमवार, १५ ऑगस्ट २०२२ रोजी तिसरा श्रावणी सोमवार, २२ ऑगस्ट २०२२ रोजी चौथा श्रावणी सोमवार आहे.
प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा सोमवार असल्यास शिवामूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे. यंदा मात्र एकूण ४ श्रावण सोमवार आहेत. शनिवार २७ ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्या असून श्रावण महिना समाप्त होईल. ● श्रावणात काय केले पाहिजे.
शास्त्रानुसार श्रावण महिन्यात शंकराची पूजा,महामृत्युंजय मंत्र, शिव पुराणाचे पाठ, रुद्राभिषेक केल्याने कर्ज, आरोग्य, दोष आणि इतर अडचणींपासून मुक्ती मिळते. श्रावण मासात अकाली मृत्यु आणि दिर्घायुष्याची प्राप्ती मिळवण्यासाठी तसेच सर्व आजारांवर मात करण्यासाठी विशेष पूजा केली जाते. तसेच श्रावणातील मंगळवार म्हणजे मंगळागौरीचे त्यामुळे मंगळवारचे देखील वेगळे महत्व आहे. श्रावणाच्या पहिल्या सोमवारनंतर म्हणजे मंगळवारी २ ऑगस्टला नागपंचमी आहे. शंकराचे आणि नागाचे विशेष नाते आहे आणि यासंबंधी कथा देखील सांगण्यात येतात. नागपंचमीच्या दिवशी शंकराला कच्चे दूध,गंगाजल,बेलपत्र, काळे तीळ, धोत्रा, मिठाई इत्यादी अर्पण करून विधीवत पूजा केली पाहिजे.
श्रावण सोमवार व्रत कथा.
देवी सतीने तिचे पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता. त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरुपात मिळवण्याचा प्रण केला होता. देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रुपात जन्म घेतला. पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला. त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला. श्रावण सोमवारच्या महादेवांना व्रत करून प्रसन्न केल्याच्या अनेक कथा मिळतात. म्हणूनच श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा. मात्र, ज्यांना शक्य नसेल त्यांनी रात्री भोजन करावे. पूजेआधी व्रताचा संकल्प करावा. नंतर शिवशंकरांचे मनोभावे ध्यान करावे.