26 जुलै : स्मरण कारगिल विजय दिवसाचे

कारगिल विजय दिवस हा भारतातील प्रत्येक नागरिकासाठी एक महत्वाचा दिवस आहे. भारतात 26 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली युद्ध झालं होतं.

1971 च्या भारत पाकिस्तान युद्धानंतरही दोन्ही देशांच्या सैन्यात अनेकदा संघर्ष पाहायला मिळाला. अणु चाचण्यांमुळे दोन्ही देशातील तणाव अजून वाढला. अशावेळी वातावरण शांत करण्यासाठी दोन्ही देशांनी फेब्रुवारी 1999 मध्या लाहोर इथं घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. या घोषणापत्रात काश्मिरच्या मुद्द्यावर दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून शांततेनं मार्ग काढतील असा करार करण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानने पुन्हा कुरघोडी करायला सुरुवात केली. पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना न कळवता युद्धाची आखणी केली होती असं सांगितलं जातं. दरम्यान, पाकिस्तानच्या सैन्याने आणि अर्ध-सैनिक दलातील जवानांनी भारतात घुसखोरी करायला सुरुवात केली. त्याला त्यांनी ‘ऑपरेशन बद्र’ असं नाव दिलं होतं. त्यांचा मुख्य उद्देश हा काश्मीर आणि लडाखमधील मुख्य अडसर दूर करणे आणि भारतीय सैन्याला सियाचिन ग्लेशियरपासून दूर सारणे हा होता.

सुरुवातीला ही एक घुसखोरी आहे आणि काही दिवसांत त्यांना बाहेर काढलं जाईल असं वाटत होतं. मात्र नियंत्रण रेषेवरील स्थिती आणि घुरखोरांच्या नियोजित रणनितीचा मागोवा घेतल्यानंतर हा मोठ्या हल्ल्याचा कट असल्याचा अंदाज भारतीय लष्कराला आला. त्यानंतर भारत सरकार आणि लष्कराने ऑपरेशन विजयची आखणी केली. 2 लाख सैनिकांना सीमारेषेवर पाठवलं. हे युद्ध 60 दिवस चाललं आणि 26 जुलै 1999 रोजी भारताने या युद्धात विजय मिळवला. या विजयात हवाई दलाचाही मोठा वाटा आहे. कारगिलच्या युद्धात साडे पाचशे जवानांना वीरमरण आलं तर 1 हजार 400 च्या आसपास जवान जखमी झाले होते.

कारगिल युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चाललं. 26 जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. युद्धावेळी भारतीय लष्करानं पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावलं. ऑपरेशन विजयचा भाग म्हणून टायगर हिलसह लष्कराच्या इतर सर्व चौक्यांवर कब्जा मिळवला. या युद्धात भारताचा विजय झाला. कारगिल विजय दिवस हा युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.