जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याच्या कार्याचे मूल्यमापन हे आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर होत असते. खरंतर वाढदिवस, सेवानिवृत्ती या आनंददायी कार्यक्रमात बहुतांश वेळा त्याचे मोजमाप होते. समाजात वावरताना समाजाशी किती एकरूप होऊन काम केले याची बेरीज वजाबाकीची गणिते अशा प्रकारच्या कार्यक्रमातून मांडली जात असल्याने जीवनात आपण काय कमावल आणि काय गमावल याचा आलेख पटकन आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. ३५ वर्षापूर्वी घाटमाथ्यावरून आलेला एक तरुण पोटापाण्याची भ्रांत मिटविण्यासाठी म्हणून मालवणी मुलखात येतो काय आणि नवख्या असणाऱ्या मालवणी मुलखातील माणसांना आपल्या लाघवी बोलण्याने आपलेसे करून जातो काय आणि मग भाषा प्रांत भाग या साऱ्या प्रश्नांची उत्तर त्या आपलेपणामुळे गळून पडतात आणि तो आपलेपणाच मालवणी माणसाच्या हृदयात कायमच घर करतो एक आपला माणूस म्हणून...... होय आपला माणूस म्हणूनच. गेली ३५ - ३६ वर्ष मालवण सारख्या ज्ञानाच्या पंढरीत सांगलीचा जयसिंग नामदेव पाटील नावाचा शिक्षक इथल्या मुलांवर संस्काराच बीज पेरून मुले घडविण्याच काम करतो, त्यावेळी निश्चितच ३६ वर्षानंतर जयसिंग पाटील नावाच्या अवलीयाला सेवानिवृत्तपर निरोप देताना प्रत्येकाचे हृदयात कालवाकालव होते. त्यांनी घडविलेली काही मुले तर आपले सर आता आपल्या गावी निघून जाणार या विचाराने काहीसे हिरमुसले होतात. पण कर्मभूमी आणि जन्मभूमी जरी वेगवेगळी असली तरी कधीही हाक मारा तुमच्या हाकेला प्रतिसाद देईन असे सांगणारे जे. एन. पाटील सारखे शिक्षक हे निश्चितच समाजासमोर दीपस्तंभ बनून समाजाला दिशा दाखविण्याच एकप्रकारे व्रत घेतात हीच तर महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या जयसिंग नामदेव पाटील यांना शिक्षणाबरोबरच खेळाची आवड होती. मैदानी खेळात तर लहानगा जयसिंग हा पारंगत होता. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. परंतु लहानग्या जयसिंगचे पाय हे मैदानातच दिसायला लागल्याने हा पोरगा गावचे नाव रोशन करणार याची खूणगाठ गावातल्या बुजूर्गानी आपल्या मनाशी आगोदरच बांधली होती. आणि घडलेही तसेच. पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण वाळवा या आपल्या जन्मगावी घेणाऱ्या जयसिंगने शालेय जीवनात शिक्षणा बरोबरच मैदानी खेळातही प्राविण्य मिळविले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी जयसिंग पाटील हे किर्लोस्कर वाडीला गेले. त्याठिकाणी ही त्यांनी खेळात आपली चमक दाखविली. महाविद्यालयीन जीवनात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय खेळाडू म्हणून सलग तीन वर्ष मान मिळविणाऱ्या जयसिंग पाटील यांनी पुढे पदवीनंतर बिपीएडच्या शिक्षणासाठी अमरावती गाठली. त्याठिकाणीही त्यांनी खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी केली. याच दरम्यान श्री. पाटील यांनी स्काऊट गाईडचा प्री हिमालय उड बॅच कोर्स पूर्ण केला. जयसिंग पाटील यांचा कबड्डी, खो - खो, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, भाला फेक, धावणे, क्रिकेट एवढेच काय तर कुस्तीची मैदानेही त्यांनी गाजविली. बीपीएड ही पदवी घेतल्याने जयसिंग पाटील हे शिक्षक बनणार हे घरातल्या लोकांबरोबरच गावातल्या लोकांनाही कळून चुकले. खरतर प्राध्यापक असणाऱ्या आपल्या काकांच्या पावलावर पाऊल ठेऊन शिक्षण क्षेत्रात काम करायच असे जयसिंगने ठरविले.
जीवनात आपण जी स्वप्न पाहतो त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी त्या स्वप्नांचाच पाठलाग केला तर निश्चित स्वप्नपूर्तीचा आनंद उपभोगता येतो, हे कॉलेज जीवनात कुठल्यातरी पुस्तकात वाचलेल्या जयसिंग पाटीलांनी त्याची पूर्तता होण्याच्या दृष्टीने घाटमाथ्यावरून कोकणची वाट धरली. कोकण हा प्रांत खऱ्या अर्थाने जयसिंग पाटील यांना नवीन होता. १९८५-८६ साली जे. एन. पाटील नावाचा तरुण कोकणातील मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या नव्याने सुरू झालेल्या डीएड कॉलेज मध्ये विज्ञान आणि शारीरिक शिक्षण अशी पदवी घेऊन मुलाखतीसाठी दाखल झाल्यानंतर त्यावेळच्या वराडकर हायस्कूलच्या संस्था चालकांनी डीएड कॉलेजमध्ये जयसिंग पाटील यांना क्रीडा शिक्षक म्हणून नेमणूक दिली. याच दरम्यान मालवणच्या भंडारी हायस्कूल मध्ये सहाय्यक शिक्षकाची जागा रिक्त असल्याची माहिती पाटील सर यांना मिळाली. त्यांनी लागलीच सहाय्यक शिक्षक पदासाठी अर्ज दिला बीएससी, बीपीएड, डिसीएम अशा पदव्या धारण केलेल्या जयसिंग पाटील यांना ५ ऑक्टोबर १९८७ मध्ये विज्ञान आणि शारीरिक शिक्षण शिकविण्यासाठी भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईच्या संस्था चालकांनी नियुक्ती पत्र दिले आणि वाळव्याचे पाटील मालवणच्या भंडारी हायस्कूलमध्ये भंडारी हायस्कूलच्या मुलांकरवी मैदानी खेळात पाटीलकी गाजवू लागले. जवळपास २९ वर्ष भंडारी हायस्कूल मध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम करणाऱ्या जे. एन. पाटील यांनी भंडारी हायस्कूलचा क्रीडा क्षेत्रात दबदबा निर्माण करून दिला. त्यांच्या कार्याची दखल भंडारी हायस्कूलच्या संस्था चालकांनी अनेकवेळा घेतली. मुलांबरोबरच पाटील सरांच्या पाठीवरही कौतुकाची थाप संस्था चालकांनी मारली. याच दरम्यान १ ऑगस्ट २०१६ मध्ये भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईच्या संस्था चालकांनी त्यांची वाडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक म्हणून नेमणूक केली.
खरतर शहर सोडून वडाचापाट सारख्या गावात जाऊन संस्थेने दिलेली मुख्याध्यापक पदाची जबाबदारी पार पाडणे हे तसे नवीन आव्हान होते. परंतु मैदानी खेळात अनेक विविध आव्हाने स्वीकारण्याची सवय असणाऱ्या पाटील सरांनी हेही आव्हान स्वीकारले आणि पाच वर्ष दहा वर्षाच्या आपल्या मुख्याध्यापक पदाच्या कारकिर्दीत अभ्यासा बरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने नवनवीन उपक्रम हाती घेतले. शिक्षणा सारख्या क्षेत्रात काम करत असताना मोठ्या माणसांचा वरदहस्त असेल तर त्या शैक्षणिक संस्थेची प्रगती होण्यास वेळ लागत नाही, हा आदर्श भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईच्या संस्था चालकांनी समाजापुढे ठेवला आहे आणि म्हणूनच मालवणचे भंडारी हायस्कूल असो व वडाचापाट चे श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल असो, एकाच संस्थेची ही दोन अपत्ये आज शिक्षण क्षेत्रात नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवून आपला वेगळा ठसा उमटवित आहेत. वडाचापाट गावचे श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जे. एन. पाटील यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय पाटकर, ऑनरारी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर आणि सर्वच संस्था चालकांचे तसेच वडाचापाटचे सुपुत्र अभिमन्यू कवठणकर यांचे लाख मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे श्री. पाटील सांगतात. संस्था चालकांच्या सहकार्या मुळेच आज वाडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलने यशस्वी घोडदौड केली आहे. या प्रशालेमध्ये गांडूळ खताबरोबरच तीन एकर जमिनीत बांबू लागवड, काजू लागवड सारखे प्रकल्प राबविले. भाजीपाला लागवडीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली, मधुमक्षिका पालन, आयबीटी सारखे उपक्रम राबविले गेले. विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळावे यासाठी संस्थेने विशेष प्रयत्न केले. या प्रशाळेच्या राष्ट्रीय हरितसेनेचे कार्य तर राज्यात लक्षवेधी ठरले आहे. महिंद्रा ट्रॅक्टर सारख्या कंपन्यांकडून या हायस्कूलच्या माध्यमातून संस्थेने वडाचापाट गावातील ग्रामस्थांना आंबा, काजू, नारळ, फणस, रतांबे झाडे वितरित करून समाजाभिमुख कार्यातही आपला ठसा उमटवला आहे. या हायस्कूलच्या जडणघडणीत म्हणा अथवा शैक्षणिक वाटचालीत म्हणा संस्था चालकांबरोबरच या हायस्कूलच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभागही महत्त्वाचा असल्याचे श्री. जे. एन. पाटील यांनी सांगितले.
मुख्याध्यापक पदावर काम करणाऱ्या जे. एन. पाटील यांची पत्नी सौ. आनंदी ही गावाकडे म्हणजे वाळवा जिल्हा सांगली येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत तर त्यांचा मुलगा अनिकेत हा मॅकेनिकल इंजिनिअरची पदवी संपादन करून क्लास वन ऑफिसर बनण्याच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे. एकूणच जे. एन. पाटील सर आणि त्यांची पत्नी सौ. आनंदी पाटील यांनी जे शैक्षणिक योगदान दिले आहे ते समाजात अधोरेखित करणारे आहे. श्री. पाटील यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल समाजाने घेतली आहे. श्री. पाटील सर यांना सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय व शिक्षकेतर कर्मचारी संघ, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ यांचे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाले आहे याशिवाय त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. जवळपास ३६ वर्ष शैक्षणिक क्षेत्रात झोकून देऊन मूल घडविण्याच काम करणारे श्री. जे. एन. पाटील सर वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होत असतानाच शिक्षक पेशातील लेण समाजाला देण्यासाठी आपण यशस्वी झाल्याची भावना घेऊन ते आयुष्याच्या नव्या टप्याकडे वाटचाल करण्यासाठी सिद्ध झाले आहेत. श्री. पाटील सर यांच्या आयुष्याची पुढील वाटचाल ही आरोग्यदायी आणि यशदायी होवो याच सदिच्छा !!
प्रफुल्ल देसाई ,मालवण
मोबा : ९४२२५८४७५९