संदेश पारकर यांच्यावर नवी जबाबदारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकण पर्यटन विकासासाठी संदेश पारकर यांना दिली मोठी जबाबदारी

               कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी शिवसेना नेते संदेश पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री पारकर यांनी यापूर्वी कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारशीने तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीवर संदेश पारकर यांची नियुक्ती झाल्याने कोकणातील पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
               पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी श्री. पारकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कोकण विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभागीय वन अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे उपसंचालक हे या समितीचे सदस्य असणार आहेत. तर पर्यटन संचानालयाचे विभागीय उपसंचालक या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. या समितीचे मुख्य कार्यालय कोकण भवन नवी मुंबई येथे असणार आहे. या पदाला राज्यमंत्री दर्जा प्राप्त आहे.
                कोकणातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामधल्या पर्यटन विकासाच्या धोरणावर ही समिती काम करणार आहे. 
                दरम्यान या नियुक्तीनंतर शिवसेना युवा नेते संदेश पारकर म्हणाले की, "कोकणात समुद्री पर्यटनाबरोबरच ऐतिहासिक पर्यटन, धार्मिक पर्यटन स्थळे यांचा व्यापक प्रमाणात समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या अनेक गडकिल्ल्यांचा इतिहास कोकणला लाभलेला आहे. रायगड किल्ला व सिंधुदुर्ग किल्ला या किल्ल्यांनी कोकणचा इतिहास आजही जपलेला आहे. या किल्ल्यांच्या विकासाबरोबरच कोकणातील पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार "असल्याची माहिती पारकर यांनी यावेळी दिली. यापुढील काळात पर्यटन हाच रोजगाराचा केंद्रबिंदू मानून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण धडाडीने काम करू असेही पारकर यांनी सांगितले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी अत्यंत धोरणात्मक विचार करून या समितीची स्थापना केलेली आहे. त्यामुळे कोकणच्या पर्यटनाला यापुढच्या काळात खऱ्या अर्थाने चालना मिळेल आणि आपणही पर्यटन विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही संदेश पारकर म्हणाले.
               

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.