स्थानिक उत्पादनांना आणि कारागिरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘व्होकल फॉर लोकल’ या अभियानाला बळकटी देण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय देशाच्या विविध भागांमध्ये ‘हुनर हाट’ नामक प्रदर्शनाचे आयोजन करत आहे. विणकर, शिल्पकार, कारागीर आणि हस्तकलाकरांच्या कलेला मान सन्मान देऊन त्यांना समाजात एक नवी ओळख मिळवून देणे आणि या कलाकारांना आर्थिक तसेच सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे हा या उपक्रमाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. देशभरातील शिल्पकार, हस्तकलाकार, विणकर, पाककला-कुशल कारागीरांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी देशात ठिकठिकाणी मंत्रालयातर्फे अशा हुनर हाट चे आयोजन केले जात आहे.
त्याअंतर्गत मुंबईत देखील 40 व्या ‘हुनर हाट’ चे आयोजन करण्यात आले आहे. मंत्रालयाने मुंबईतील बांद्रा-कुर्ला संकुलामध्ये आयोजित केलेल्या ‘हुनर हाट’ या प्रदर्शनाला जनतेची मोठी पसंती मिळत आहे. शनिवारी, 16 एप्रिलला सुरु झालेल्या या हाटमध्ये पहिल्या दिवसापासूनच लोकांनी मोठी गर्दी केलेली दिसून येत आहे.दररोज, मोठ्या संख्येने लोक येथे येऊन देशभरारन आलेल्या कारागिरांच्या कलाकुसरीच्या वस्तूंच्या दुकानांना भेटी देऊन आपली खरेदीची हौस भागवीत आहेत.
येथे उभारलेल्या स्टॉल्समध्ये देशभरातील कारागिरांनी हस्तकला, शिल्पकला आणि चित्रकला यांच्यातील कौशल्य वापरून जीव ओतून तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तु, दैनंदिन वापराच्या वस्तु, शोभेच्या वस्तु योग्य भावात मिळत असल्यामुळे हौशी खरेदीदार त्यांची खरेदीची हौस पुरेपूर भागवीत आहेत आणि त्यातून विणकर, शिल्पकार यांना देखील मोठे प्रोत्साहन मिळत आहे.
‘हुनर हाट’ मध्ये आपल्यातील प्रत्येकासाठी काही ना काही खास गोष्टी उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या खेळण्यांपासून, मोठमोठ्या दगडी मुर्त्या आणि लाकूड-लोखंडापासून तयार केलेले सुरेख फर्निचर यांची एक विस्तृत श्रेणी तुम्हांला खरेदीसाठी येथे उपलब्ध आहे.
तुम्हांला शोभेच्या वस्तूंची आवड असेल तर तुमच्यासाठी मातीच्या, चिनीमातीच्या, आणि पितळेच्या नानाविध शोभेच्या वस्तु, वेत तसेच बांबू यापासून तयार केलेली विविध उत्पादने, चामड्याच्या वस्तु, चित्रे, सुकवलेली फुले, वैशिष्ट्यपूर्ण अन्टिक वस्तु तुमची खरेदीची हौस पूर्ण करतील. विविध प्रकारचे नवनवीन पद्धतीचे कपडे, गालिचे तसेच सजावटीच्या सामानाने ओसंडून वाहणारी येथील दुकाने लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
खरेदीसाठी उभारलेल्या स्टॉल्सबरोबरच येथे भेट देणाऱ्या लोकांसाठी फूड कोर्टमध्ये पारंपारिक पद्धतींनी तयार केलेले असंख्य प्रकारचे चवदार खाद्यपदार्थ, मिठाई आणि पक्वान्ने तयार आहेत. देशातील विविध राज्यांची खासियत सांगणाऱ्या जवळपास 60 स्टॉल्समधील खाद्यपदार्थांनी येथे येणाऱ्या लोकांचे पोट आणि मन तृप्त होऊन जात आहे. या खाद्यपदार्थांना लोकांची मोठी वाहवा मिळत आहे.
चहा, कुल्फीपासून, बिहार राज्याचे वैशिष्ट्य असणारा लिट्टी-चोखा, राजस्थानची चवदार दाल बाटी चूरमा, रबडी-जिलबी, दिल्लीचे चटपटीत चाट, इंदोरचे चविष्ट पोहे, मुगडाळीचा चीला आणि अशा इतर अनेकानेक पाककृती एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे खवय्ये मंडळींना मेजवानीच मिळते आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसिध्द असणाऱ्या खाद्यपदार्थांचा मुंबईत एकाच ठिकाणी आस्वाद घेता येत असल्यामुळे खाद्यप्रेमींची पावले आपोआप येथे वळत आहेत. मांसाहाराची आवड असणाऱ्यांची देखील येथे मोठी चंगळ आहे. हैदराबादची सुप्रसिद्ध बिर्याणी, मोगलाई पदार्थ, चिकन कबाब आणि टिक्का, शीख कबाब अशा असंख्य मांसाहारी पाककृतींची येथे लयलूट आहे. या हाट मधील आणखी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे फूड कोर्टमध्ये लोकांना शांतपणे बसून खाण्याचा आस्वाद घेण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना ताटकळत उभे राहून, एका हातात खाण्याचे ताट धरून, सामानावर लक्ष ठेवत समोरचे पदार्थ पोटात ढकलण्याची वेळ येत नाही.
‘हस्तकला, पाककला आणि संस्कृती यांचा संगम’ या हुनर हाटच्या संकल्पनेला मुंबईतील हा हाट शंभर टक्के न्याय देत आहे. उत्कृष्ट कलाकुसर आणि चविष्ट पाककृतींसोबतच, येथे रोज संध्याकाळी संगीत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जात आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार येथे येऊन आपल्या कलेचे सादरीकरणे करत आहेत. याखेरीज, या ठिकाणी सुप्रसिद्ध रॅम्बो इंटरनॅशनल सर्कशीतील उत्तमोत्तम कलाकार आश्चर्यचकित करणारे मनोरंजक खेळ करून दाखवीत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हुनरहाटमध्ये सर्वांना मोफत प्रवेश आहे. येथे प्रवेश मिळण्यासाठी पैसे खर्चून कोणतेही तिकीट काढावे लागत नाही.
27 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या हुनर हाट मध्ये येणाऱ्या लोकांसाठी सोयीसुविधांची चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणची स्वच्छता, नियमित साफसफाई आणि सुरक्षेचे योग्य उपाय योजलेले आहेत. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रवेशद्वारापासून हाटच्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. येथील सर्व व्यवस्था चोख ठेवणारे हाउसकीपिंगचे कर्मचारी देखील उत्तमरित्या त्यांचे काम करताना दिसतात. हाटमध्ये पावलापावलावर लोकांच्या सोयीसाठी कचऱ्याचे डबे ठेवण्यात आले आहेत. या सर्व व्यवस्थेबरोबरच, आयोजकांचे विशेष पथक देखील वेळोवेळी येथील सुविधांकडे बारकाईने लक्ष पुरवीत आहे. ‘हुनर हाट’ मध्ये येणाऱ्या लोकांना कोणत्याही समस्येला तोंड द्यावे लागू नये म्हणून विशेष दक्षता घेतली जात आहे.