सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विख्यात पर्यटनाला आता ग्लोबल टुरिझमचे कोंदण लाभणार आहे. कुडोपीची कातळशिल्पे 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळांच्या प्रस्तावित यादीत समाविष्ट झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला झळाळी मिळणार आहे.
देशातील 'जागतिक वारसा स्थळां'ची संख्या वाढविण्याच्या राज्य शासनाचा पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभाग आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. केंद्र सरकारने पाठविलेल्या तीन प्रस्तावांना 'युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर'ने हिरवा कंदिल दाखवला आहे. या तीन प्रस्तावांमध्ये 'कोंकणातील कातळशिल्पा'चा समावेश असून सिंधुदुर्गातील कुडोपीच्या कातळशिल्प ठिकाणाचा यात समावेश आहे.
याआधीच जागतिक पटलावर पोचलेल्या कोंकणातील कातळशिल्पांना 'जागतिक वारसा स्थळा' म्हणुन अधिकृत मान्यता मिळण्याच्या दृष्टीने आता दुसरे महत्वाचे पाऊल पडले आहे. राज्य सरकारने याबाबतचा पाठविलेला प्रस्ताव केंद्र सरकारने 'युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर'ला पाठविणे, हा पहिला टप्पा गेल्यावर्षी पार पडला होता. त्याची छाननी करुन हे सर्व प्रस्ताव 'युनेस्को'च्या कार्यात्मक मार्गदर्शक तत्वांच्या कसोट्यांवर उतरतात. त्यामुळे त्यांचा समावेश भारतातील जागतिक वारसा स्थळांच्या प्रस्तावित यादीत करण्यात आला आहे आणि ही यादी अद्ययावत करण्यात आली आहे, असे 'युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर'चे संचालक लाझारे इलोन्दू असोमो यांनी 'युनेस्को'मधील भारताच्या कायम प्रतिनिधी मंडळाचे राजदूत विशाल शर्मा यांना २५ मार्च २०२२ रोजी पत्र पाठवुन कळविले आहे.हा दुसरा टप्पा पार पडल्यानंतर राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने पुढची प्रक्रिया तातडीने सुरु केली.
कोंकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येच जांभा दगडाच्या सड्यावरील कातळशिल्पे आढळून येतात. या प्राचीन वारशाबाबत जनजागृती व्हावी, संरक्षणाचे उपाय योजावेत, यासाठी पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांच्या पाठिंब्याने कातळशिल्पांच्या ठिकाणीच म्हणजे कुडोपीच्या सड्यावर पंचायत समितीच्या एका विशेष सभेचे आयोजन १ जानेवारी २०२० रोजी केले.कुडोपी गावातून कातळशिल्प ठिकाणाकडे जाणाऱ्या रस्त्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, नागरिक या सर्वांनी या विषयाकडे आस्थापुर्वक पाहिले तर या कातळशिल्पांचे संरक्षण निश्चितपणे होईल आणि हा वारसा आपण पुढील पिढ्यांकडे सुस्थितीत सुपुर्द करु शकु.
ही सर्व कातळशिल्पे अंदाजे इसवीसनपूर्व १० ते २० हजार वर्षे या काळातील असावीत, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. त्या काळात कोंकण प्रदेशात प्रगत मानवी संस्कृती नादत असल्याचे या शिल्पाकृतींच्या रचना, खोदकाम, विषय, कलात्मकता यावरुन दिसुन येते. या सर्व कातळशिल्पांचा सविस्तर अभ्यास होणे आवश्यक आहे. यामुळे कोकणातील तत्कालिन संस्कृतीवर अधिक प्रकाश पडु शकेल.
★★★
कातळशिल्प संशोधक व अभ्यासक सतीश लळीत यांनी अलिकडेच या विषयावर 'सिंधुदुर्गातील कातळशिल्पे' हा संदर्भग्रंथ प्रसिद्ध केला आहे. 9422413800 या क्रमांकावर संपर्क केल्यास जिज्ञासुंना तो उपलब्ध करुन घेता येईल.