महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्यात येत असलेला रेवस ते रेड्डी सागरी मार्ग ४९८ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गासाठी ९,५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आधीच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करून हा मार्ग उभारला जात आहे.
रेवस ते रेड्डी या सागरी मार्गाचा आराखडा तयार झाला असून त्याला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. नव्याने तयार केलेल्या आराखड्यानुसार १६५ किलोमीटरचा रस्ता चौपदरी करण्याला मान्यता मिळाली आहे. तर या मार्गाचा उर्वरित रस्ता दुपदरी असणार आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे प्रकल्प खर्चात वाढीची शक्यता वर्तविली जात आहे.यापूर्वीच्या नियोजनानुसार दुपदरी मार्ग उभारला जाणार होता. मात्र आता त्यात बदल करण्यात आला असून सुधारित आराखड्यानुसार सुमारे १६५ किमीचा रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. तर उर्वरीत रस्ता दुपदरी असेल. तसेच ३३ प्रमुख गावे आणि शहरांच्या ठिकाणी बाह्य वळणे घेतली जाणार आहेत. त्यातून गावातून जाणाऱ्या मार्गावर होणारी कोंडी टळणार असून वाहनांचा प्रवास जलद होण्यास मदत मिळणार आहे.
● प्रमुख चौपदरीकरण मार्ग
मालवण ते गोवा राज्य सीमा - ६५ किमी
रत्नागिरी ते पावस - २० किमी.
द्रोणागिरी ते मुरुड जंजिरा - ८० किमी.