मत्स्यसंपदा योजनेतून बहरेल मत्स्यव्यवसाय

 
श्री सदगुरु सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन, मत्स्यव्यवसाय कार्यालय आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना माहिती कार्यशाळा” स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे संपन्न झाली. नविन उद्योजकांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायात प्रकल्प करावेत, असे प्रतिपादन उद्योजक निलेश घाटकर यांनी यावेळी केले. 


कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन उद्योजक निलेश घाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, तसेच पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, मत्स्य उद्योजक मेहता उपस्थित होते.

उद्योजकांच्या सोयीसाठी सिंधुदुर्गमथ्ये रेल्वेचे बुकिंग ऑफिस सुरु करण्यासाठी चेंबरच्या माध्यमातून प्रयत्न करणार असे यावेळी चंद्रशेखर पुनाळेकर यांनी सांगितले. यावेळी खुल्या समुद्रातील पिंजरा मत्स्य संवर्धन , समुद्री शेवाळ संवर्धन, शिंपले संवर्धन, शोभिवंत मत्स्यपालन, मोठया आकाराचे RAS कप, बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन आणि प्रकल्पासाठी अर्थसहाय्य मार्गदर्शन आदि विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी FSTO चे व्यवस्थापक व स्टेट बँक ऑफ इंडिया पणजी चे प्रशासकीय अधिकारी परमेश्वर नवघरे, जिल्हा समन्वयक तथा स्टेट बँक ऑफ इंडिया कुडाळ व्यवस्थापक विनायक कुऱ्हाडे यांनी बँकेच्या विविध योजना आणि अर्थसहाय्याबद्दल मार्गदर्शन केले. तर सहायक मत्स्य आयुक्त रविंद्र मालवणकर, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र मालवणचे प्रशिक्षण अधिकारी प्रदीप सुर्वे यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेबद्दल मार्गदर्शन केले. 


सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्यातील ५२ नव उद्योजकांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. यावेळी संस्थेच्यावतीने मत्स्य संपदा योजना कार्यान्वित करण्यासाठी नवउद्योजकांना मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल तयार करणे, आवश्यक ते प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी बँका आणि नवउद्योजक यांच्यामध्ये समन्वय साधून आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे यासारखी कामे आपल्या संस्थेमार्फत केली जाणार आहेत.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक महेश मांजरेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि आभार संस्थेचे सचिव भालचंद्र राऊत यांनी मानले. यावेळी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना माहिती कार्यशाळेचे समन्वयक राजेश साळगावकर आणि सहसमन्वयक  अभिमन्यू गावडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.