रोजगार मेळावा : कोकणच्या उज्ज्वल उद्यासाठी


माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेशजी राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १७ मार्च रोजी कुडाळ येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणच्या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी घेण्यात येणारा अलीकडच्या कालावधीतील हा पहिला उपक्रम १७ मार्च २०२२ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत कुडाळ एसटी डेपो जवळच्या मैदानावर घेण्यात येणार आहे. www.nileshrane.in या लिंकवर क्लिक करून अर्ज भरून आपले नाव नोंदवता येणार आहे. सिंधुदुर्गातील तरुणांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे  भविष्यात कारात्मक परिणाम दिसून येणार आहेत.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजकारणाचा झंझावात सिंधुदुर्गात सुरु झाला आणि कोकणी तरुणांच्या हाताला काम मिळू लागले. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर किनारी भागातील तसेच सह्याद्रीच्या खोऱ्यातील निसर्गसंपन्न भागातील तरुणांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. बांधकाम व्यवसाय, हॉटेल व्यवसाय वाढीस लागला. त्यासोबत अन्य पूरक उद्योगांना राणे साहेबानी प्रोत्साहन दिले. त्या माध्यमातून हजारो तरुण पोटापाण्याला लागले. याच कालावधीत रोजगाराच्या शोधात मुंबईला होणारे स्थलांतर मोठ्या  प्रमाणात थांबले.

२०१४ सालानंतर मात्र हे चित्र बदलले. कोकणातील तरुणांचा फक्त सत्तेसाठी आणि राजकारणासाठी वापर करणारे सत्तेत आले. तरुणांच्या खांद्यावर झेंडे आणि स्वतःला कंत्राटे घेणारे सत्तेत आले. नेत्यांच्या बुडाखाली फॉर्च्युनर आल्या, आणि सामान्य तरुण त्यांच्यामागे वेड्यासारखा फिरू लागला. रोजगार, उलाढाल, विकास, जीडीपी, दरडोई उत्पन्न असे शब्द जिल्ह्याच्या राजकारणातून हद्दपार झाले. आणि खंजीर, मावळे, कोथळे, षडयंत्र, खोट्या तक्रारी असे प्रकार वाढले. कुडाळ - मालवण मतदारसंघातले रस्ते मृत्यूचे गोल झाले. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला तडाखा बसला.कृपेने एसटी बंद झाली. प्रकल्पाना विरोध झाले. कंपन्या बंद झाल्या. नवी गुंतवणूक बंद झाली. कुडाळ मालवण आणि सावंतवाडी वेंगुर्ला अशा दोन मतदारसंघात राज्यकर्ते आहेत की नाहीत असा प्रश्न निर्माण झाला. स्वतः काही करायचे नाही, काही होऊ द्यायचे नाही आणि नुसती टीका करीत फिरायचे आणि त्यासाठी खंडणीखोर कारकून पदरी ठेवायचे, असे प्रकार वाढीस लागले. त्यामुळे सिंधुदुर्गातील सामान्य तरुणाला  पुन्हा एकदा मुंबईची वाट धरण्याची वेळ आली.

अशी अंधाराची स्थिती निर्माण झालेली असताना एक आशेचा किरण रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी नितेश राणे यांनी असा रोजगार मेळावा घेतला होता. आणि त्या माध्यमातून शेकडो कोकणी तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त झाली होती. आता तीच पहाट पुन्हा उगवत आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून कोकणातील शेकडो तरुण हक्काची भाकरी आपल्या गावाच्या परिसरात आणि अन्यत्रही मिळवू शकतील. 

या रोजगार मेळाव्यात तब्बल ३५ कंपन्या सहभागी होणार आहेत. यात पेटीएम, टाटा मोटर्स, आयडीएफसी बँक अशा नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. हॉस्पिटॅलिटी, माहिती तंत्रज्ञान, इव्हेन्ट मॅनेजमेंट, ऑटोमोबाईल, प्रॉपर्टी अशा विविध क्षेत्रातील कंपन्या या मेळ्यात सहभागी होतील. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या कंपन्या फक्त ऑफर लेटर देणार नाहीत, तर रोजगार दिलाच पाहिजे, अशी अट या कंपन्यांना घालण्यात आली आहे. या मेळाव्यात ज्यांना लगेच नोकरी मिळणार नाही त्या तरुणांना जॉब कार्ड दिले जाईल आणि त्याचा क्युअर कोड  करून दिला जाणार आहे. या माध्यमातून यावेळी संधी न मिळालेल्या तरुण तरुणींना पुढील वर्षभरात त्यांच्या आवडत्या क्षेत्रात नोकरी मिळू शकेल.


निलेशजी राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक भव्य रोजगार मेळावा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातला आहे. आणि दुसरीकडे केंद्र सरकारचे मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्रालय सिंधुदुर्गचे तारणहार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे आहे. आपल्या सिंधुदुर्गच्या दृष्टीने हा एक दुग्धशर्करा योग आहे.   

हा रोजगार मेळावा एक संधी आपल्या दारी घेऊन आला आहे. संधी दार वाजवते आहे. आता दार उघडणे आपल्या हाती आहे.
 
"- राजवीर पाटील, सिंधुदुर्ग

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.