मी काही थियेटर संदर्भातला एक्स्पर्ट नव्हे. तरीही साहित्य, कला रंगभूमी ,तत्वज्ञान समीक्षा यापासुन स्वतःला फार दुरही ठेऊ शकत नाही.
अनिल सरमळकरचे The fox हे नाटक पुस्तक रुपाने प्रकाशित झाले त्यानंतर या नाटकाबद्दल मी बरीचशी चर्चा आणि कौतुक ऐकले होते. प्रत्यक्षात मी जेव्हा हे नाटक वाचायला घेतले तेव्हा भारावून गेलो आणि ते वाचुन पूर्ण होइपर्यंत खाली ठेवले नाही.
The fox वाचताना जागोजागी जाणवले की अनिल कांबळे - सरमळकर हा तरूण नाटककार प्रचंड क्षमतेचा कलावंत आहे. साहित्य ,तत्वज्ञान ,कला रंगभूमी आणि संगीत याची इतकी वैश्विक जाण एकाचवेळी असणे हे खुप दुर्लभ असते. यातुन अनिलचा व्यासंग जाणवतो
तो किती आणि कसा केला असेल त्याने प्रतिकूल परिस्थितीत ?
त्याची इंग्रजी भाषेवरची हुकुमत आणि प्रायोगिकता एखाद्या मोठ्या श्रेष्ठ नाट्य जाणकारालाही भारावून टाकेल अशी आहे.मला त्याहूनही अनिलचे कौतुक आणि अपृप यासाठी वाटते की अनिल एका सामान्य दलित कुटुंबातुन आला आहे. आणि सामान्य मराठी माध्यमातून शिकलेला इंग्रजीचा उच्च पधवीधर आहे आणि तरीही त्याने साहित्याप्रती जी निष्ठा आणि जे सातत्य दाखविलेय ते मुग्ध करणारे आहे. आधीच मी म्हणाल्याप्रमाणे मी काही रंगभूमीचा जाणकार नाही.
तरीही अनिलच्या लेखनाचा दर्जा आणि depth सहजच जाणवणारी आहे.
The fox मध्ये त्याने केलेले भाषेचे प्रयोग अचंबित करणारे आहेतच , ते प्रयोग समजुन घेण्यासाठी मलाही हे नाटक वाचताना अनिलशी संवाद साधावा लागला. त्यानंतर जे अनिलने या नाटकातील सर्व प्रकारच्या प्रायोगिकतेचे जे स्पष्टीकरण दिले जे विश्लेषण केले आणि त्याला जो जागतिक साहित्य आणि रंगभूमीचा वैचारीक संदर्भ त्याने दिलाय त्यामुळे मलाच हे नाटक वेगळ्या पद्धतीने समजले आणि लक्षात आले की आपण कीती महत्त्वाचे हे लेखन वाचत आहोत आणि हा साधा सामान्य वाटणारा अनिल सरमळकर कीती खोलात उतरला आहे आणि त्याचवेळी तो एका उंचीवर उभा राहुन हे जग बघत आहे. एक भारतीय अर्थतज्ञ आणि विचारवंत आणि समाज सुधारक म्हणुन आणि शोषित समाज आणि चळवळीत माझी मुळे असल्यानेच दलित समाजातुन आलेल्या अनिल सरमळकर या प्रचंड क्षमता असलेल्या लेखकाचे खुप कौतुक आहेच आणि त्याच्याकडून सहजच अपेक्षाही वाढल्या आहेत.
अजूनही महत्त्वाचे भरपूर इंग्रजी लेखन अनिलने केले आहे आणि दलित लेखनाचे भारतीय इंग्रजी साहित्यामध्ये रोपण केले आहे व स्वताचे स्थान निर्माण करुन नव्या पिढीला प्रेरणा दिली आहे.
The fox या नाटकात सत्तेचे अत्यंत भयभीत करणारे प्रत्यंतर जे अनिलने उभे केले आहे ते हादरवून सोडणारे आहेच पण त्यातील मांडणी जी त्याने केली आहे तशी मी तरी यापूर्वी कुठेही पाहिलेली नाही.
नाटकाचे कथानक अंगावर काटा आणणारे आहे. आणि एकूण मानवी समाजाला जो सत्तेच्या केंद्रीकरणाचा हुकुमशाहीचा आणि भयानक विकृतीचा जो धोका आहे तो या नाटकात रेखाटुन अनिलने पुर्ण वैश्विक मानवी समाजाला सावध केले आहे त्याअर्थी अनिल खरोखरच वैश्विक नागरिक आणि वैश्विक लेखक झाला आहे हीच अभिमानास्पद बाब आहे.
यापुढेही असेच उच्च दर्जाचे आणि एकुण मानवी समाजाला सजग करणारे लेखन अनिलकडुन व्हावे यासाठी मी त्याला मनपूर्वक शुभेच्छा देत आहे.
-- डॉ. भालचंद्र मुणगेकर.
( ज्येष्ठ भारतीय अर्थतज्ज्ञ. माजी खासदार )
( मुळ इंग्रजी अभिप्रायाचा मराठी अनुवाद )