शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चिती करण्यासाठी 18 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार 31 डिसेंबर हा मानीव दिनांक निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे जुलै ते नोव्हेंबर महिन्यातील जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून मानीव दिनांक बदलामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन 2022-23 साठी किमान वयोमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे.
शाळांनी पूर्व प्राथमिकसाठी कमी-जास्त वयाचे कारण देऊन प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही. 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई प्रवेशासाठी 31 डिसेंबर 2022 अखेर प्रवेशासाठी निश्चित असलेले वय असावे लागणार आहे.
पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे, किती वर्षासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावा हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाने मात्र शाळा प्रवेशाचे वय निश्चित केले.