कोकणातील सर्वात सुंदर प्रदेशाची छायाचित्र सफर
"कथा,कविता किंवा कादंबर्यांची पुस्तके वाचायची असतात. पण छायचित्रांची पुस्तके ही वाचायची असतात असे म्हटले तर"...
'सिंधुदुर्ग तिर्थ' प्रकाशनने 'सिंधुदुर्ग देशा' नावाचे पुस्तक प्रकाशित केले.या पुस्तकातले प्रत्येक छायाचित्र वाचनीय आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कळवा ठाणे येथे रहाणारे श्री. प्रल्हाद भाटकर आणि त्यांची मुलगी सेरा भाटकर यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा पालथा घालून एक एक छायाचित्र काढले आहे. प्रत्येक छायाचित्रात एक गोष्ट आहे ती आपल्याला वाचावी लागते. सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकण पर्यटन जिल्हा आहे. या जिल्ह्यावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. कोकणातल्या या नितांत सुंदर प्रदेशात फिरताना कोणालाही हा निसर्ग आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा मोह झाल्याशिवाय रहाणार नाही.
प्रल्हाद भाटकर हे मुळचे तळ कोकणातलेच असल्याने प्रत्येक सुट्टीत मुलगी सेराला बरोबर घेऊन कोकणात जात असत आणि दोघही वेड्यासारखे संपूर्ण जिल्ह्यात फिरत असत. जे जे चांगले आहे ते ते आपल्या कॅमेऱ्यात टिपत असत. दोघा बापलेकिंना सिंधुदुर्गच्या या निसर्गाने वेडावून टाकले होते. या वेडापायीच 'सिंधुदुर्ग देशा'ची निर्मिती झाली आहे.
पुस्तकातले प्रत्येक छायाचित्र अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. एका एका छायाचित्रासाठी दोघांनाही प्रचंड मेहनत घेतली आहे. उन,पाऊस, थंडीची तमा न करता प्रसंगी उपाशीपोटी राहून पायाला चाके लावून 'सिंंधुदूर्ग देशा'चे स्वप्न साकार केले आहे. श्री. उद्धवजी ठाकरे यांनी काही वर्षापूर्वी 'महाराष्ट्र देशा' हे छायाचित्रांचे पुस्तक प्रकाशित केले होते.भाटकरांचे पुस्तकही असेच काहीसे आहे.
उत्तुंग डोंगर, अथांग सागर, पुरातन मंदिरे हे कोकणचं वैभव आहे. कोकणातील समाज जीवन, सांस्कृतिक वारसा तसेच कोकणातील कलाकारी यातील प्रत्येक गोष्टींचा वेध भाटकर पिता पुत्रीने घेतला आहे. पुस्तकात कोकण रेल्वेचा एक फोटो आहे. हा फोटो काढण्यासाठी या बाप लेकीने रत्नागिरीतील भोस्ते घाटावर चढून कित्येक तासांची प्रतिक्षा केली आहे. कोकणातील जनजीवन समजून घेऊन अनेक फोटो काढले आहेत. फोटोला दिलेली कॅप्शन ही खुपच समर्पक आहेत .अनेक ठिकाणी चारोळींची पेरणी केली आहे .त्यामुळे पुस्तक अजूनच देखणे झाले आहे.
तुळसी वृंदावन, सावंतवाडीचे मोती तलाव, वेगवेगळी मंदिरे यांची छायाचित्रे अप्रतिमच आहेत. एका फोटोत तर नुकताच पाऊस पडून गेला आहे, शेते पाण्याने भरून गेली आहेत, हिरवाई बहरली आहे, शेतातल्या वेगवेगळ्या वाफ्यात वेगवेगळ्या रंगाचे पाणी आहे, पाणी, माती, हिरवे शेत यामुळे जमिनीवर वेगवेगळ्या टाईल्स लावल्या सारखे भासत आहे. हे सगळं टिपण्यासाठी नजरही तशीच हवी. ती भाटकरांकडे आहे. कोकणातील स्वयंपाक घरातील वातावरण, समुद्राची वेगवेगळी रूपे, पावसाळ्यात वहाणाऱ्या नद्या, धबधबे यांची छायाचित्रे तर अफलातूनच आहेत. कोकणातील ग्रामीण समाज जीवन आणि व्यक्तीमत्वे त्या खालील लिहिलेल्या छोट्या पण सुंदर ओळींनी अधोरेखित केली आहेत. बाप आणि लेकिने निसर्गातील छोट्या छोट्या गोष्टी अशा टिपल्या आहेत कि बघणाऱ्याने अचंबित व्हावे.
शिमगोत्सव, गणेशोत्सव म्हणजे कोकणातील खरे जीवन या उत्सवामधील वेगळेपण अचूक दाखवले आहे. समुद्र किनाऱ्यावरील कोळ्यांचे जीवन, कोकणी मेवा, आंबा, काजू, फणस, जांभूळ यांची मनमोहक रुपे, कोकणातील विविधरंगी घरे हि छायाचित्रे बघताना आपण मनाने कधी कोकणात जाऊन पोहचतो ते आपल्यालाही समजत नाही. काही चित्रे तर पेंटिंग्ज केल्या सारखी वाटतात. निसर्ग चित्रे तर अफलातून डोळ्यांचे पारणे फेडणारी आहेत. पेरणी, लावणी, नांगरणी, कापणीची छायाचित्रे पाहून आपणही त्या छायाचित्रांचा भाग असल्याचा भास होतो. कोकणातील लालपरी, पाणंदी, रूपेरी वाळूचे आणि निळेशार समुद्र किनारे, डोंगर उतारावरील शेती तसेच कोकणातील कलाविश्व प्रल्हाद भाटकर आणि सेरा भाटकर यांनी उत्कृष्ट पद्धतीने आपल्या समोर मांडले आहे. पुस्तकाला 'वस्रहरण' कार श्री.गंगाराम गवाणकर यांचे शब्दरुपी आशिर्वाद लाभले आहेत.
- पुस्तक समीक्षण - जयेश अ.माधव
छायाचित्रेः सेरा भाटकर
: प्रल्हाद भाटकर
प्रकाशकः सिंधुतीर्थ
किंमतः २५०/-