या वस्तू होणार स्वस्त
अर्थसंकल्प 2022 मध्ये अनेक वस्तूंवर सीमा शुल्क, आयात शुल्क तसेच अनेक शुल्क वाढवणे आणि कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. यामुळे 1 एप्रिलपासून कपडे, चामड्याचे सामान, मोबाइल फोन, चार्जर, हिरे, हिऱ्याचे दागिने, शेतीची अवजारे, पॉलिश केलेले हिरे, विदेशी मशीन, इलेक्ट्रॉनिक साहित्य स्वस्त होणार आहेत.
या वस्तू महागणार
छत्री, इमिटेशन ज्वेलरी, लाउडस्पिकर, हेडफोन, इअरफोन, सोलर सेल, एक्स रे मशीन, इलेक्ट्रॉनिक खेळणी महाग होणार आहेत.
टीव्ही, एसी, फ्रीज महागणार
सरकारने १ एप्रिलपासून अॅल्युमिनियम धातूंवर ३० टक्के आयात शुल्क लागू केले आहे. याचा वापर टीव्ही, एसी आणि फ्रीजसाठी हार्डवेअर बनवण्यासाठी केला जातो. कच्च्या मालाच्या महागड्या पुरवठ्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढून त्याचा थेट बोजा ग्राहकांवर पडणार आहे. याशिवाय कंप्रेसरमध्ये वापरल्या जाणाऱ्या पार्ट्सवरही आयात शुल्क वाढवण्यात आले आहे, त्यामुळे रेफ्रिजरेटरच्या किमती वाढणार आहेत.
पोस्ट ऑफिस नियम
1 एप्रिल 2022 पासून, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि मुदत ठेव खात्यांवरील व्याजाचे पैसे फक्त बचत खात्यामध्ये मिळतील. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही व्याजाचे पैसे रोखीने घेऊ शकत नाही. बचत खाते लिंक केल्यावर, व्याजाचे पैसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ट्रान्सफर केले जातील. सरकारने MIS, SCSS, टाइम डिपॉझिट खात्यांच्या बाबतीत मासिक, त्रैमासिक, वार्षिक व्याज जमा करण्यासाठी बचत खाते वापरणे अनिवार्य केल्याचा मोठा बदल होणार आहे
पीएफ खात्यावर कर
सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी, करदात्याने 31 डिसेंबर 2021 पर्यंत त्याचे कर विवरणपत्र दाखल करणे आवश्यक होते. जर ही तारीखदेखील चुकली असेल, तर तुम्ही हे काम 31 मार्च 2022 पर्यंत उरकून घ्या. केंद्र सरकार 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू करणार आहे. 1 एप्रिल 2022 पासून सध्याचे पीएफ खाते दोन भागांमध्ये विभागले जाऊ शकते, ज्यावर कर देखील आकारला जाईल. नियमांनुसार, ईपीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त मर्यादा लागू केली जात आहे. याच्यापुढील योगदानावरील व्याजाच्या उत्पन्नावर कर आकारला जाईल. त्याचवेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीपीएफमध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा वार्षिक 5 लाख रुपये आहे.
Axic बँकेच्या नियमांमध्ये बदल
1 एप्रिल 2022 पासून अॅक्सिस बँकेच्या सॅलरी किंवा सेव्हिंग अकाऊंटवरील नियम बदलणार आहेत. बँकेने बचत खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा 10 हजारांवरून 12 हजार रुपये केली आहे. अॅक्सिस बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने मोफत रोख व्यवहारांची विहित मर्यादा देखील बदलून चार विनामूल्य व्यवहार किंवा 1.5 लाख रुपये केली आहे. 4 एप्रिलपासून 10 लाख आणि त्यावरील धनादेशांची पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.
औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ
1 एप्रिलपासून पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. ड्रग प्राइसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाने शेड्यूल्ड औषधांच्या किमतीत 10.7 टक्के वाढ करण्याची परवानगी दिली आहे, त्यानंतर आता 800 हून अधिक औषधांच्या किमती वाढतील.
एलईडी बल्बच्या किमतीतही वाढ
एलईडी बल्ब बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या सामग्रीवर मूलभूत सीमा शुल्कासह 6 टक्के प्रतिपूर्ती शुल्क आकारण्याचे सरकारने म्हटले आहे. १ एप्रिलपासून नवीन नियम लागू झाल्यानंतर एलईडी बल्बही महाग होणार आहेत. सरकारने चांदीवरील आयात शुल्कातही बदल केला असून, त्यामुळे चांदीची भांडी आणि त्यापासून बनवलेली उत्पादनेही १ एप्रिलनंतर महाग होणार आहेत. याशिवाय स्टीलच्या वस्तूंनाही महागाईचा फटका बसणार असून उद्यापासून स्टीलची भांडी महागणार आहेत
मोबाईलमुळे खिशावरचा भार वाढेल
मोबाईल फोन बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या प्रिंटेड सर्किट बोर्डवरही सरकारने कस्टम ड्युटी लावली आहे. म्हणजेच बाहेरून या उत्पादनांची आयात आता महाग होणार असून, त्याचा परिणाम कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर होणार आहे. अमेरिकन फर्म ग्रँट थ्रॉन्टनच्या मते, सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार असून मोबाईलच्या किमती वाढू शकतात.