केंद्र शासनाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या आर्थिक पाहणी अहवाल २०२१-२२ नुसार ११ हजार ३०८ मान्यताप्राप्त स्टार्टअप्ससह महाराष्ट्र राज्य या क्षेत्रात देशात अव्वल स्थानावर आले आहे. याबरोबरच देशभरात 2021-22 आर्थिक वर्षात सुरु झालेल्या ४४ स्टार्टअप्स यूनिकॉर्नपैकी ११ यूनिकॉर्नस् महाराष्ट्रातील आहेत. या कामगिरीद्वारे स्टार्टअप ईकोसिस्टिममध्ये महाराष्ट्र हे देशातील अव्वल राज्य ठरले आहे.
यूनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन ७ हजार ५०० कोटी ते 75 हजार कोटी रुपये आहे. देशभरातील 44 पैकी ११ म्हणजे 25 टक्के यूनिकॉर्नस् महाराष्ट्रातील आहेत. ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.
राज्यात 32 हजार 662 इतके नोंदणीकृत स्टार्टअप आहेत. त्यापैकी 11 हजार 705 स्टार्टअप हे मान्यताप्राप्त आहेत. देशात सुमारे 62 हजार मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 5 ते 7 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये 30 नोंदणीकृत आणि 9 मान्यताप्राप्त तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 32 नोंदणीकृत आणि 11 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. मुंबई महानगर प्रदेशात 14 हजार 710 नोंदणीकृत तर 5 हजार 938 मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. त्याचबरोबर पुण्यामध्ये 8 हजार 603 नोंदणीकृत तर 3 हजार 375 मान्यताप्राप्त, औरंगाबादमध्ये 774 नोंदणीकृत तर 220 मान्यताप्राप्त, सिंधुदुर्गमध्ये 36 नोंदणीकृत तर 14 मान्यताप्राप्त याप्रमाणे स्टार्टअप आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तरुण नवीनवीन संकल्पना पुढे आणण्यासाठी योगदान देत आहेत.