● आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अत्याधुनिक बोटीचे सिंधुदुर्गमध्ये लोकार्पण
● अत्याधुनिक बोटीमुळे मिळणार जलपर्यटनाला चालना
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून मालवण येथील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अॅक्वाटीक स्पोर्टसला (इसादा) अत्याधुनिक बोटी देण्यात आले आहे. या बोटींचे उद्घाटन राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
राज्यातील साहसी पर्यटनाला चालना देणे, स्थानिकांसाठी पर्यटनाच्या संधी निर्माण करणे आणि साहसी पर्यटन अधिक रोमांचकारी बनविणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन मालवण येथील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अँक्वाटीक स्पोर्टसच्या (इसादा) माध्यमातून निवति रॉक जवळील समुद्री तळाचे अंतरंग न्याहाळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताफ्यात एक अत्याधुनिक बोट दाखल होत आहे.
सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्याच्या योजनेतील हा पहिला टप्पा समजला जात आहे.
परदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची डायव्हिंग बोट वापरली जाते. अशीच ही बोट असणार आहे. या बोटीवर स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, प्रशस्त डेक आणीं केबिन, लाईफ सपोर्ट यंत्रणा व उत्तम सीटिंग व्यवस्था असणार आहे. रात्रीच्या स्कुबा डायव्हिंग साठीही या बोटीवर आधुनिक यंत्रणा असणार आहे.
मालवण येथील एमटीडीसीच्या स्कुबा डायव्हिंग सेंटरमधून पर्यटकांना नीवती रॉक जवळील समुद्रात दर्जेदार स्कुबा डायव्हिंग घडवून आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जात आहेत. परंतु निवती रॉक जवळ पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी अत्याधुनिक बोटीची गरज भासत होती. इसदाच्या ताफ्यात आता अत्याधुनिक बोट दाखल होत असल्याने निवती रॉकजवळील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे