आज लिहीताना ऊर आनंदाने भरुन येतोय. गेल्यावर्षी जड अंत:करणाने यात्रेवर लेख लिहीला होता; पण आज लिहीताना "याच साठी केला होता अट्टाहास.." अशी जाणिव मनात होत आहे. कारण गेल्यावर्षीच तुम्हाला सुखाचा पट मांडायला आणि ओंजळीने सुख वाटायला '१ मार्च २०२२ रोजी यात्रेला जरुर या!'अशी साद घातली होती, ती आज सर्वांना कुठेतरी ऐकु गेलीय असं वाटतंय. होय कुणकेश्वर यात्रा होतेय!
अगदी पुर्वीच्या थाटात आणि त्याच जल्लोषात पार पडतेय. ही सर्वार्थाने यात्रा का आहे? याचा प्रत्यय आज येतोय. राजकीय आणि प्रशासकिय ईच्छाशक्ती कामी आलीच,पण त्याहून कामी आली ती तुम्हा शिवभक्तांची "पुण्याई ". त्याच जोरावर यंदाची कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा उत्साहात पार पडतेय. कुणकेश्वराचं आणि भक्तांच नातं किती दृढ करणारा हा सोहळा आहे याची प्रचीती येतेय.
एस.टी. चा संप असतानाही ज्या उदारतेने स्वतःहून दानशूर भाविक पुढे येऊन गावागावातून मोफत बसेस भक्तांसाठी उपलब्ध करुन देत आहेत, ते पाहता ही यात्रा फक्त कुणकेश्वर ग्रामस्थांची न राहता सर्व शिवभक्तांची झाली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी यात्रेचा सोहळा तुम्ही भक्तजनांनी जो मनामनात भरवलेला होता तो प्रत्यक्षात साकार करण्यासाठी यात्रेला 'अवघे अवघे या... अवघाचि संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगातून ही प्रतिज्ञा करताना सांगितलंय की, हे मी कसं करु शकेन? तर ते भगवंताच्या दर्शनाने साध्य होईल. ही भावना मनात जपून अवघे अवघे या...
आज कुणकेश्वर भक्तीरसात न्हाऊन निघालयं! कुणकेश्वरात एरव्ही वर्षभरात खूप उत्सव होतात पण यात्रा हा त्याचा 'परमोच्च बिंदु'असतो. महाशिवरात्रीला त्या एका सेकंदासाठी तुम्हाला कुणकेश्वर दुरुन जरी पाहता आला ना तर ते सुख वर्षभराच्या उत्कर्षासाठी पुरुन उरतं. ती जी उर्जा घेऊन तुम्ही मंदिरातून बाहेर निघता ना तेव्हा तुमचं मन त्या शिवलिंगाला घट्ट बिलगुन मिठी मारुन बसलेलं असतं. तुमच्यावर कुणकेश्वराचे कृपाहस्त पडत असतात. तुमच्या देहातला ईश्वर जागृत होऊन तुम्हाला भविष्यासाठी तयार करत असतो आणि हा प्रत्येक शिवभक्ताचा अनुभव आहे. जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात,
" पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा ।
तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे॥"
त्या शिवाच्या भक्तीचा डांगोरा असा काही पिटुया, त्या कुणकेश्वराचा जय जयकार असा काही करुया की, काळ बनून आलेल्या कोरोनाला ही त्याचा धाक बसेल. त्यासाठी भाविकजनहो!अवघे अवघे या....
मंदिराच्या गाभार्यात बसलेला कुणकेश्वर तुमच्या भेटिसाठी आसुसलेला आहे त्याचे नामस्मरण करुन मनात फक्त ईच्छा प्रकट करा मग बघा तुमचे पाय आपसुकच कुणकेश्वराकडे वळतील. ३६० खेड्यांचा अधिपती आपल्या गावरयतेला घेऊन कुणकेश्वरची यात्रा करतोय मालोंडची पावणाई रवळनाथ यात्रेसाठी येताहेत कोकणातील गावर्हाटितला हा देवभेटिचा अगम्य सोहळा पाहण्यासाठी अवघे अवघे या... कुणकेश्वरच्या समुदातील लाटा आज खूप उत्साही दिसत आहेत. गतवर्षी ह्या पवित्र तिर्थावर भाविकांना सचैल स्नान त्यांना घडवता आलं नाही तो सागर आज पुन्हा एकदा भाविकांना पवित्र करण्यासाठी सज्ज झालेला आहे. कुणकेश्वरात होणार्या देवतांच्या पवित्र तिर्थस्नानाची पर्वणी साधण्यासाठी अवघे अवघे या....
ग्रामस्थ म्हणून जरी आम्ही यजमानपद भूषवित असलो तरी ही यात्रा प्रत्येक कोकणवासियाची आहे जगाच्या कानाकोपर्यात असलेल्या कुणकेश्वर भक्तांची आहे. यात्रा ही एक परंपरा आहे जी कित्येक काळापासून आपण जोपासत आलेलो आहोत आपण ही परंपरा वाढवली त्याची किर्ती दाही दिशांत पसरवली त्याला छेद देण्याचा कोणालाही अधिकार नाही तो अधिकार कुणकेश्वराने स्वतःकडे राखून ठेवलाय असे आपण गृहीत धरुया आणि त्या कुणकेश्वराच्या या महासोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होऊया त्यासाठी शिवभक्तांनो जसे असाल जिथे असाल तिथून यात्रेला अवघे अवघे या...
॥ जय कुणकेश्वर ॥
( हेमंत पेडणेकर - कुणकेश्वर )