आंगणेवाडीच्या वार्षिकोत्सवाचा लेख लिहिताना शब्द ना नेहमी त्या धामापूरच्या तळ्यातल्या परडीसारखे भरभरून येतात. फुल सोडावीत आणि फक्त सोने यावं. इतरांना कितीही वाटा , आपली ओंजळ नेहमी भरुन उरतेच. यंदाही ओंजळ तीच आहे फक्त आता देवीकडे मागायला मला कुठल्याही गाऱ्हाण्याची गरज नाही, डोळ्यांच्याच ओंजळी झाल्या आहेत. ती आंगणेवाडीची देवी अखंड त्रैलोक्य सत्ताधीश आहे.. पण 'आई' म्हणून तिचे आणि फक्त तुमचे नाते आहे.. आई आणि मुलाच्या नात्यात मध्यस्थ कोणी असू शकतच नाही.. एक वर्ष जत्रेला न जाणे हे भाविक म्हणून समजू शकतो. पण एक वर्ष आईला न भेटणे हे रितेपण मागची दोन वर्षे लाखो काळजाच्या उरात होते. त्या प्रश्नांचे एक पूर्णत्व यंदा आंगणेवाडीच्या जत्रेत मिळेल, म्हणून यंदाची ओढ ही भावीकपणापेक्षाही पुत्रवत असीम बनलीय
सतत धावत्या आयुष्याला एक खंडित काळाची विश्रांती मिळाली आणि अदृश्य असणाऱ्या काळनारदाने प्रश्न विचारला की तू हे सगळं कोणासाठी करतोय, का धावतोय. मनाला निष्ठुर बनवणाऱ्या त्या प्रत्येक वाल्याने न मिळणाऱ्या उत्तरासोबत स्वतःला शोधायला सुरुवात केली आणि मनाच्या गाभाऱ्यातला लपून बसलेला देव त्याला उलगडू लागलाय. आज आंगणेवाडी जत्रेच्या निमित्ताने देव नावाची गोष्ट कळसात नसते ती गाभाऱ्यात असते याचा प्रत्येकाला झालेला साक्षात्कार कुठलेही बोजड धर्मग्रंथ न वाचता एका सश्रद्धपणाच्या जाणिवेचा अनवट प्रवास आहे.
एक तप म्हणजे बारा वर्षे म्हणतात. बारा वर्षाचा अखंड काळ लोटल्या नंतरच्या जगण्याला मग तपनिर्मोह म्हणून स्वीकारताना मागच्या एक वर्षी जत्रेला जाता आलं नाही म्हणून काळजाचा झालेला दगड आठवताना प्रत्येकाला यंदा जत्रेकडे ओढतोय. जिथे माणसाचा राबता भूइवरच्या प्रत्येक जागेला व्यापून टाकतो तिथे कुणीही माणूस नसणे ही कल्पना जिथे करवत नाही तिथे ते रिकामे मळे, रिकामा गाभारा, रिकामे रस्ते पाहणे म्हणजे किती वेदनादायी असू शकते याचा अनुभव मागच्या वर्षी आयुष्यात एकदा तरी जत्रेला गेलेल्या माणसाने ते उणेपणे पाहताना नक्की घेतला असेल.
यंदा पुन्हा आंगणेवाडीची जत्रा भरतेय. मर्यादा फक्त भौतिक असतात आणि अथांगता ही माणूसपणाच्या श्रद्धेत खोल खोल असते.. यंदा जत्रा स्मरताना मागच्या वर्षीचे रितेपण आठवलं तरच यंदाच्या जत्रेच्या वाटेवर निघताना प्रत्येक क्षणी डोळे भरून येतील. मागच्या वर्षी याच आंगणेवाडी जत्रेवर लिहिताना जत्रा भाविकांसाठी खंडीत झाली हे स्वीकारताना 'हारी पडलो आता संकट निवारी' लिहिताना जी तळमळ होती , त्याच तलमळीला आता श्रद्धा गोष्ट पुरती उमगून चुकलीय. किंबहुना माझ्यासह अनेकांना जत्रेसाठी केवळ रस्त्यावर रेंगाळण्यापेक्षा लोक तासन तास जत्रेत दर्शनरांगेत का उभी राहतात या प्रश्नाचे उत्तर देणारी ठरतील.
ही जत्रा ना लोकांची नसतेच मुळी.. आंगणेवाडीची जत्रा ही माणसाची असते. आपल्या माणसांनी आपल्या माणसाला भेटायची ती एक तिथी असते. एकाच आईच्या लेकरांचा तो कौटुंबिक सोहळा असतो. ज्यांना ज्यांना आंगणेवाडी शब्द ठाऊक असतो त्या प्रत्येकाला या जत्रेला आज इथे प्रत्यक्ष यायचे असते. पंढरीच्या कळसाला पाहून जे सुख मिळते तेच सुख इथं कळस दर्शनाला पाहून मिळते. मंदिर, भक्ती, नियोजन, राजकीय नेते, पोलीस, प्रशासन , एसटी महामंडळ आणि बाजाररहाट यांचा हा सरळरेखीय आलेख असतो. आणि त्याच आलेखावर लाखो बिंदू 'भक्त' म्हणून स्वतःला ओवतात ना त्या उत्कर्षरेखेला खऱ्या अर्थाने जत्रा म्हणतात.
मागच्या दोन वर्षांपासूनचे कोरोनाचे सावट यंदाही आहेतच, आणि म्हणू यंदाही निर्बंध आहेत, अनेकासाठी यंदाही जाणे दुरापास्त आहे. त्या प्रत्येकाला प्रत्येकाने जत्रेपर्यंत नेणे अवघड असेल कदाचित पण आपापल्यापरीने एक मोठी ओटी आपल्या वाट्याला आली आहे. यंदा जत्रेला जाणाऱ्या माणसांनी जत्रेला न आलेल्या माणसापर्यंत ही जत्रा न्यायला हवी. प्रत्यक्ष जत्रेला आलो नाही तर आईच्या आणि तिच्या लेकरामधील ही भेट प्रत्येकाने आपल्यापरीने शोधली तरी जत्रा यंदा कोट्यवधी माणसाची होईल. याच जत्रेत मिळणाऱ्या शिताच्या प्रसादाचा जो संदेश आहे त्याचा खरा अर्थ यंदा शोधायची गरज निर्माण झालीय. जर प्रसादाला मिळणारी चार शिते आपण दुसऱ्यासाठी प्रयत्नपूर्वक आणून देत असू तर मग ओंजळभर आनंद नाही का देऊ शकत ?
#जत्रा #आंगणेवाडी #2022