'तेरा त्रिक एकोणचाळीस'
हे पुस्तक आपल्या हाती देताना मला साहजिकच अत्यंत आनंद होत आहे. माझा स्वभाव अत्यंत निरागस आहे. लहान मुलांसारखा भाबडा मनमोकळा आहे ..हे मलाही माहितच होतं. माझ्या अक्षरावरून तुमच्या ते लक्षात आलं असतं. पण इथे टाईप केलेल्या माझ्या वळणदार अक्षरावरून तुमच्या कदाचित ते लक्षात येणार नाही. आपल्यातलं लहान मुल मारू नका. लहान मुल तसंच राहू दे..अशी आरडाओरड सगळीजणं करतात. पण प्रत्यक्षात लहान मुलांना चांगलच झोडपून काढतात. लहान मुलातलं लहान मुल खेळकर राहावं म्हणून कोण फारशी काळजी घेताना दिसत नाही.मोठ्यांच्या वागण्या बोलण्यात अशी विसंगती दिसली तरी (म्हणूनच ती मोठी असतात) लहान मुलं ही लहान मुलंच असतात. जसं झाडावरच्या फुलांना कोणी कितीही नाव ठेवली तरी ती कोमेजत नाहीत, रंग बदलत नाहीत की वास बदलत नाहीत. तसं लहान मुल असतं आणि गोष्ट ही त्यांच्या अत्यंत आवडीची असते. गोष्ट ऐकताना मोठं माणूसही लहान मुल होवून जातं..मग लहान मुलांची तर बातच निराळी..
मुलांच्या मनाचं पोषण खऱ्या अर्थाने पुस्तकांनी होतं असं मला वाटतं. (हल्ली मोबाईलवर लहान मुलांना गोष्ट गाणं लावून देण्याची घातक पध्दत रूजत आहे. ती गोड आवाजातली म्युझिकसकट गोष्ट ऐकवण्यापेक्षा आपल्या जाड्याभरड्या आवाजात गोष्ट ऐकवणं अधिक सकसपणाचं आहे.त्यामुळे मुलं लवकरच स्वत: वाचायला लागतात.) पुस्तकं जे चित्र मुलांच्या डोळ्यासमोर उभं करतात..ते जगात कोणीच करू शकत नाही. खूप पुस्तक वाचणारा माणूस केवळ आपल्या पुरतं बघू शकत नाही.
अर्थात माझ्यामधे लहान मुल एवढं लपलेलं होतं, याचा मला पत्ताच नव्हता. ‘झी मराठी’वरील आमच्या ‘हास्यसम्राट’ या मालिकेचे दिग्दर्शक श्री. महेंद्र तुकाराम कदम हे लहान मुलांसाठी 'अफलातून' ही मालिका करत होते. तेव्हा त्यांनी मला या मालिकेसाठी काही गोष्टी लिहायला सांगितल्या. या पुस्तकाचं श्रेय त्यांनाही जातं. मी खुपच लिहिल्या. यातल्या काही गोष्टी टीव्हीवर सादर झाल्या आहेत. तर तेव्हा मला एवढ्या गोष्टी सुचायच्या की गोष्टींचा धबधबा तयार झाला. राजापुरच्या गंगेचा जसा अचानक प्रवाह सुरू होतो तसंच काहीसं झालं. रोजची दैनंदिन कामं कशीतरी आटपून मी लिहायला बसायचे. गोष्टी हाताच्या बोटातून धावत सुटायच्या. घरातली सगळीजणं आश्चर्याने माझ्याकडे बघायची. (ती फणसासारखी नजर मी कधीच विसरणार नाही.) तर त्याच ह्या गोष्टी. लहान मुलांसाठी लिहिणं सगळयात अवघड आहे, असं म्हणतात.पण मला काही तसं जाणवलं नाही. भिजत घातलेल्या मटकीला सहज मोड यावेत (फडका बिडका न बांधता ) तशा सहज गोष्टी सुचत गेल्या.
गंमत म्हणजे या गोष्टी मलाच आवडल्या असल्यामुळे त्या प्रकाशित कराव्या, असं मला वाटलं. असं पण क्वचितच होतं की आपलं लेखन आपल्याला खूप आवडतं आणि आपल्याकडूनच आपल्यावर अन्याय होवू नये असं वाटतं. जे.के.रोलिंग यांच्या हॅरी पॉटरप्रमाणे हे पुस्तक पण ब-याच ठिकाणी फिरवलं. (लहान मुलांच्या चांगल्या पुस्तकाच्या बाबतीत हे असं नेहमीच होतं.)
काहीनी त्यात बदल सुचवले. गोष्ट –“रामपुर नावाचं एक गाव होतं. त्या गावात लखन नावाचा एक गरीब माणूस राहात होता किंवा एका गावात एक गरीब विधवा राहात होती.तिला एक मुलगा होता.ती मोलमजुरी करून आपलं पोट भरत होती.” अशा स्टाईलने लिहायला सांगितलं. पण अशी सुरुवात केली तर पुढची गोष्ट मॅच होत नव्हती. माझ्या मते एकदा गोष्टीतला प्राण गेला की ती किती सजवली तरी काही उपयोग नाही. अर्थात मला ही गोष्ट अजिबात आवडली नाही. मला माझी स्टाईल आवडली होती. प्रथम पुरूषी एकवचनात या गोष्टी आहेत.शेवटच्या दोन गोष्टीत मुलं पौंगंडावस्थेत प्रवेश करताना दिसतात. (आपली एक वेगळीच स्टाईल आहे ..असं मला पण वाटतं) त्यामुळे मी नकार दिला. अनेक प्रकाशकांनी या ना त्या कारणाने पुस्तक प्रकाशित करायला नकार दिल्याने आता मी स्वत:च ते प्रकाशित करीत आहे. या पुस्तकासाठी मला हवी होती तशी कल्पक चित्रं माझ्या मुलाने शुभेंदूने काढली आहेत. त्याचंही खूप कौतुक. प्रख्यात विनोदी लेखक श्रीकांत बोजेवार यांनी एक सुरेखशी प्रस्तावना या पुस्तकासाठी लिहून दिलीय त्यांचे मन:पूर्वक आभार. माझं एक स्वप्न पुरं होतंय. कुमार गटासाठी हे पुस्तक आहे. त्यामुळे मुलांनो वाचा आणि जरूर कळवा तुम्हाला कसं वाटतंय ते..
- सई लळीत saeelalit@gmail.com