कोकणच्या माणसाचे दर्शन घडविणारा 'वणवा' कथासंग्रह

'वणवा' हे बाबू घाडीगांवकर यांचे दुसरे पुस्तक. या अगोदर त्यांचा 'बाबा' हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला आहे.'वणवा' हा लघुकथा संग्रह आहे. लेखकाचा जन्म,बालपण, शिक्षण कोकणातच झाले आणि आता नोकरीही कोकणातच असल्यामुळे कोकण, तेथील निसर्ग, लोकजीवन, माणसे लेखकाच्या नसानसांत भिनली आहेत. लेखकाच्या नेहमीच्या निरीक्षणातून या कथांचा जन्म झाला आहे.

कोकणातील लोकांच्या जीवनमानात अलिकडच्या काळात अमुलाग्र बदल झाला आहे पण पूर्वीचे कोकण आणि तेथील माणसे खुपच लाघवी होती आणि ती लेखकाला अधिक भावतात.जरी बदलत्या काळाप्रमाणे माणसे बदलत असली तरी 'कोकणची माणसे साधीभोळी' हे ब्रिदवाक्य अजूनही आपलेपणा जपून आहे.

कोकणातला माणूस कलेवर जीवापाड प्रेम करतो. प्रसंगी त्यासाठी आपल्या जीवाचीही पर्वा करत नाही. हे 'सोंगाड्या' या पहील्याच कथेतून जाणवते. "मी मेलय तरी चलात..पण कला जीवंत ऱ्हवाक होयी." हे कथेच्या नायकाचे वाक्य हृदय चीरून जाते.

स्टेटस,स्टोरी आणि लोच्या..!ही कथा अर्धवट सोडून दिल्या सारखी वाटते पण कथेच्या शेवटी वाचक विचार करत रहातो..पुढे काय झालं असेल..? जणू कथेचे बिज मनात ठेऊन वाचकाच्या मनात ते अंकुरत रहाते. ही या कथेची ताकद म्हणायला हवी.

'विटाळ' या कथेतून ग्रामीण जीवनातील जुन्या चुकीच्या प्रथा परंपरावर प्रहार करण्यात आला आहे. त्या 'विटाळ' प्रथेमुळे असे कित्येक सुगंधांचे जीव गेले असतील याचा अंदाजही कोणाला नसेल. हे लेखकाने प्रभावीपणे दाखवून दिले आहे. 'होवूर' या कथेतून कोकणात भविष्यात शेतकऱ्यांची काय अवस्था होऊ शकते हे दीसून येते.कोकणात शेतकऱ्याने शेतीला किंवा कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही पण परिस्थिती अशीच राहीली तर कोकणातही हे होऊ शकते याची जाणीव ही कथा वाचताना होते.

लघुकथा असल्याने खुप छोट्या छोट्या कथा आहेत  पण सर्वच कथा आपल्या मनाचा ठाव घेतात. लेखनाची ओघवती भाषाशैली आणि कथेतील पात्रांचे मालवणी भाषेतील संवाद वाचताना आपणही त्या कथेतील एक पात्र होऊन जातो.

'वणवा'हा फक्त जंगलातच लागतो असे नाही तो माणसाच्या मनातही सतत धगधगत असतो पण त्या वणव्यावर मात करून माणूस जीवन जगत असतो. पुन्हा पुन्हा त्या वणव्याच्या राखेतून ऊभा रहात असतो. प्रत्येक कथेमधून हे जीवन आपल्याला उलगडत जातं.

मालवणी मुलूख, तेथील लोकजीवन, बोलीभाषा, संस्कृती समजून घ्यायची असेल,मालवणी माणसाला समजून घ्यायचं असेल तर 'वणवा' हा कथसंग्रह वाचायलाच हवा.

पुस्तक परिचयः जयेश अ.माधव (9167710614)

पुस्तकः वणवा
लेखकः बाबू घाडीगांवकर
किंमतः१५०₹

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.