सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेतर्फे मराठी भाषादिनाचे औचित्य साधून रविवार 27 फेब्रुवारी 2022 रोजी सायं 7 वा. मालवणी बोली कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.ऑनलाईन होणाऱ्या या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध मालवणी कवयित्री डॉ. सई लळीत यांची निवड करण्यात आली आहे. मालवणी बोली कवितांमध्ये ज्यांचा काव्यसंग्रह प्रथम प्रसिद्ध झाला त्या ज्येष्ठ कवी दा. र. दळवी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या कविसंमेलनासाठी कवी रुजारीओ पिंटो, प्रा.नामदेव गवळी, वैभव साटम, कल्पना बांदेकर, सुनंदा कांबळे, श्रेयश शिंदे, दिलीप चव्हाण, बाबू घाडीगांवकर आणि स्वप्नील वेंगुर्लेकर आदी कवींना निमंत्रित करण्यात आले आहे.
कोणतीही प्रमाण भाषा बोलीमुळे समृद्ध होत असते. प्रमाणभाषा दीर्घकाळ टिकते यामागे त्या भाषेच्या बोलींच योगदान महत्त्वाचं असतं. जर बोलीभाषा संपल्या तर प्रमाणभाषाही संपून जाते. ज्येष्ठ भाषातज्ञ डॉ गणेश देवी यांच्या संशोधनानुसार 220 बोलीभाषा नष्ट झाल्या आहेत. अशावेळी बोलींचे संवर्धन महत्त्वाचे ठरते. मराठी भाषा दीर्घकाळ टिकवायची असेल तर मालवणी सारख्या अनेक बोलींचे स्थान अबाधित ठेवायला पाहिजे आणि बोली भाषा टिकविण्यासाठी त्यातून विविध साहित्याची निर्मिती होणे व ते साहित्य लोकांपर्यंत सातत्याने पोहचविले पाहिजे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषादिना सदर मालवणी बोली कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्या डॉ.लळीत या गेली अनेक वर्ष निष्ठेने मालवणी बोली कविता लिहीत आहेत. एक हास्य कलाकार म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. त्यांचा 'वांगड' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला असून अलीकडेच त्यांच्या कवितांचा नाट्याविष्कारही सादर करण्यात आला आहे. त्यांचे हे मालवणी बोली कवितांचे योगदान लक्षात घेऊन त्यांची कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.