नव्या अर्थबदलांच्या विचाराकडे झेपावताना

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (मासिया) चे अध्यक्ष श्री ललितभाई गांधी आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे आणि निमित्त आहे ते आजच्या कणकवली येथे होणार्‍या जिल्हा व्यापारी मेळाव्याच्या उद्घाटन समारंभाचे! त्या अर्थाने आजचा हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नव्या उद्योजकीय वाटचालीसाठी एक आशादायक संधी निर्माण होताना दिसत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघ व्यापाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि व्यवसायातील अडचणींवर मात करण्यासाठीचे मातब्बर व्यासपीठ आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्र राज्यातील व्यापार-उद्योग व कृषि पुरक उद्योगांची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर (मासिया) गेली ९५ वर्षे काम करत आहे. शताब्दी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या संस्थेच्या अध्यक्षपदी ललितभाई यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आज प्रथमच ते कणकवली येथे होत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी मेळाव्याच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार असुन, दिवसभरात विविध व्यापारी व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधिबरोबर वेगवेगळ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. साहजिकच या विचारमंथनातून जिल्हा सकारात्मक घोषणेची वाट पाहणार असेल, तर ते चुकीचे ठरू नये. कोरोना नंतरच्या बदलत्या आव्हानात्मक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्री ललितभाई गांधी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सकडून जिल्ह्याच्या उद्योग आणि व्यापारी जगताला फार मोठ्या अपेक्षा आहेत. इथल्या उद्योग, व्यापार, सेवाउद्योग व कृषीक्षेत्राच्या वर्तुळाचे ललितभाईंच्या आजच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक विकासाचा पाया रचण्यात महाराष्ट्र चेंबर अर्थात मासियाचे योगदान फार मोठे आहे. शेठ वालचंद हिराचंद, शंतनूराव किर्लोस्कर, आबासाहेब गरवारे, डहाणूकर यांच्या औद्योगिक परंपरेचा वारसा मासियासोबत जोडला गेलेला आहे. शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणार्‍या "मासिया" च्या ४० व्या अध्यक्षपदी नुकतीच श्री ललितभाई गांधी यांची निवड झाली असुन "अध्यक्ष' या नात्याने त्यांचा हा पहिलाच सिंधुदुर्ग जिल्हा दौरा ठरतो आहे.

माननीय श्री ललितभाईंच्या कामाचा आवाका आणि झपाटादेखील फार मोठा आहे. संक्षिप्तपणे त्यांच्या कामाची ओळख करून देणे काहीसे कठीणच आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतून घडलेल्या या शिल्पाने आज राष्ट्रीय स्तरावर एक प्रथितयश व्यवसायिक आणि सामाजिक कार्यातील अग्रणी नेतृत्व म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आज महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारणी समितीवर मागील वीस वर्षे सातत्याने विविध उच्च पदांवर काम करत असताना व्यापारी व उद्योजकांच्या न्याय्य मागण्यांसाठी, संरक्षणासाठी आक्रमकपणे लढणारे लढवय्ये नेते अशी त्यांची देशभरात ख्याती आहे. ललितभाई हे देशभरातील ७ कोटी व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स(CAIT) चे 'राष्ट्रीय संघटन मंत्री' म्हणून जबाबदारी पाहत असून वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रो व एज्युकेशन (वेसमॅक) चे अध्यक्ष व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स (KCCI) या संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत. फिक्की, इंडियन मर्चंट्स चेंबरचे कार्यकारिणी सदस्य आहेत. राजारामपुरी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून गेली २६ वर्षे त्यांच्याकडे आग्रहाने पदभार सोपविला जात आहे.

केवळ व्यवसायातील यश हेच साध्य नव्हे, तर सामाजिक बांधिलकी मानत विविध संस्थांच्या माध्यमातून ते सक्रियपणे, संवेदनशीलतेने समाजासाठी अहोरात्र कार्यरत असतात. जितो, ग्लोबल मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशन, मिशन कॅन्सर कंट्रोल इंडिया या संस्थांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भरीव काम केले आहे. मॅफकॉसचे माजी अध्यक्ष, महावीर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, भारत सरकारच्या पर्यावरण व वने मंत्रालयाच्या सीपीसीएसइए समितीतर्फे विविध युनिव्हर्सिटीवर ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम पहात आहेत. त्यांनी जपान,थायलंड, फ्रान्स, इंग्लंड, मॉरिशस, अमेरिका, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ या देशांना भारताच्या वतीने व्यापार प्रतिनिधी मंडळाद्वारे भेटी दिल्या आहेत.  सहकार भूषण राष्ट्रीय पुरस्कार, नियोजन आयोगाचे सदस्य डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार, राजीव गांधी एक्सलन्सी अवार्ड, भगवान महावीर अहिंसा पुरस्कार,जैन समाजरत्न पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. २०१५ साली तत्कालीन राष्ट्रपती मा.श्री प्रणव मुखर्जी यांच्या समवेत स्वीडन दौऱ्यात, तसेच २०१८ साली माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समवेत ग्रीस दौऱ्यावर जाण्याची संधी त्यांना मिळाली. २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिष्टमंडळातून आफ्रिका दौऱ्यावर जाण्याची संधी त्यांना मिळाली . स्वत:च्या बांधकाम, रिअल इस्टेट व कृषिपूरक उद्योगांव्यतिरिक्त सहकार, बँकिंग इत्यादी विविध क्षेत्रातील प्रचंड अनुभव व अभ्यासामुळे विविध विषयांवर मार्गदर्शन व अभ्यासपूर्ण मांडणीसाठी त्यांची विशेष ख्याती आहे

त्यांच्या या अनुभवाचा आणि अभ्यासाचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला निश्चितच होऊ शकतो.  त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्याशी त्यांचे जुने नातेही आहे. वडिलांच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचा या जिल्ह्याशी अगदी बालपणापासून जवळून संबंध आला आहे. आज जिल्ह्याच्या व्यापार-उद्योग व्यवसायाची स्थिती संवेदनशील असताना ललितभाईंच्या अनुभवाचा आणि महाराष्ट्र चेंबरच्या कामाचा या जिल्ह्याला फार मोठा उपयोग होऊ शकतो. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, या जिल्ह्याचे सुपुत्र असलेले ना.नारायणराव राणे यांच्याकडे असलेले केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय यांचा योग्य उपयोग व नियोजन करून त्याचा लाभ जिल्ह्यातील उद्योजकांना मिळवुन देण्याचे कौशल्य ललितभाई आणि त्यांच्या महाराष्ट्र चेंबरकडे नक्कीच आहे.

गेली काही वर्षे महाराष्ट्र चेंबरने केलेल्या विविध यशस्वी प्रयोगांचे एकत्रित मॉडेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवता येईल. त्यादृष्टीने नक्कीच विचार होणे गरजेचे आहे. हे मॉडेल भविष्यात कदाचित पूर्ण देशभर आदर्शवत बेस मॉडेल ठरेल. या सगळ्यासाठी आज महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष म्हणून श्री ललितभाई गांधी यांचा एक निर्णय खऱ्या अर्थाने "निर्णायक" ठरू शकतो.

त्यासाठी त्यांच्या मागील काही नव्या प्रयोगांचा विचारही करावा लागेल. महाराष्ट्र चेंबर आणि मॅजिक औरंगाबाद संस्था संयुक्तपणे गेली सहा वर्षे नव्या स्टार्टअपना प्रमोट करण्यासाठी इंक्युबेशन सेंटर चालवतोय. महाराष्ट्रातल्या सहा विभागात सहा इंक्युबॅशन सेंटर आता नव्याने सुरू होत आहेत. "त्यातून निवडलेल्या सहा जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर सहा जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी विशेष डेडीकेटेड असलेली क्लस्टर बेस डेव्हलपमेंट करण्यासाठीची "वुमन्स एक्सलन्स सेंटर" बनवण्यात येत आहेत. ती नव्या स्टार्टअपसाठीही असतील, तसेच रेग्युलर ऍक्टिव्हिटीजसाठी देखील असतील. "वुमेन्स इन्ट्राप्रिनरशिप" ला दिशा देणारी अशा प्रकारची सहा नवी सेंटर्स सुरू केली जात आहेत. कृषी प्रक्रियेतून अशा स्टार्टअप्सना फार मोठी संधी आहे. कृषि प्रक्रीया उद्योगामध्ये आज नवनवीन संकल्पना येत आहेत आणि त्या यशस्वी होत आहेत. यासाठी सहा जिल्हे निवडले जात आहेत. म्हणजेच, पुढील दोन वर्षात १८ जिल्ह्यांमध्ये इंक्युबेशन सेंटर्स, क्लस्टर बेस्ट वुमेन्स डेव्हलपमेंट सेंटर्स आणि बिझिनेस एक्सलन्स सेंटर्स निर्माण करण्यात येणार आहेत. ज्याद्वारे महाराष्ट्रातल्या युवकांना नवनव्या इंडस्ट्रीजमध्ये स्टार्टअप्स,  नव्या कन्सेप्टस्साठी प्रमोशन मिळेल. यामध्ये मुख्य गरज आहे असेल ती मेंटॉरशिपची! महाराष्ट्र चेंबरची सगळ्यात मोठी ताकद अर्थातच यातील रिसोर्सेस हीच आहे. सगळ्या टाईपच्या इंडस्ट्रीजमधले एक्सपर्ट आज महाराष्ट्र चेंबर्सकडे आहेत हे वास्तव आहे. डिक्की, फिक्की सारख्या नावाजलेल्या संस्थांच्या सहयोगातून एक मजबूत पूल तयार करणे आणि स्टार्ट टू फिनिश सगळे सहकार्य नव्या उद्योजकांना मिळवून देणे हा महाराष्ट्र चेंबरचा सर्वात महत्वाकांक्षी आणि आजचा सर्वाधिक गरजेचा उपक्रम ठरू शकतो. या सर्व इंडस्ट्रियल एक्सपर्टस् चा अनेक वर्षांचा तज्ञ अनुभव, अभ्यास, व्हिजन एकत्रित करून त्याचा फायदा नवीन उद्योजकांना देण्याचा चेंबरचा प्रयास आहे. त्यांच्या स्टार्टअप्सचे पेटंट रजिस्टर, डिझाईन, मार्केट प्रमोशन अशा, उद्योजकाला गरजेच्या बारा गोष्टींसाठी त्यांना मदत केली जाणार आहे. अगदी फायनान्शियल गरजेच्या पूर्तीसाठीही चेंबर त्यांना मदत करणार आहे. आजपर्यंत तब्बल ७०० नव्या स्टार्टअप्सना चेंबरने प्रमोट केले असून त्यापैकी ८० देशी  स्टार्टअप्स आज प्रत्यक्षात सुरु झाले आहेत. चेंबरने सुरू केलेल्या उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमातून आज जवळपास ४,२०० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. 

या सगळ्या अनुभवाचा लाभ जिल्ह्याला मिळवून देण्यासाठी ललितभाईंची भूमिका मोलाची ठरेल. इथल्या उद्योगविश्वाला एक नवी झळाळी मिळेल. कठीण परिस्थितीतही जिल्ह्यात हवेचा रुख योग्य दिशेने चालला आहे, फक्त वेळीच शिड उभारण्याची आज गरज आहे. कोरोनानंतर आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी आजचा जिल्हा व्यापारी मेळावा आणि त्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चरचे (मासिया) चे अध्यक्ष श्री ललितभाई गांधी यांची उपस्थिती ही जिल्ह्याची नव्या दिशेकडे होणारी वाटचाल आणि त्यादृष्टीने पडलेले पहिले पाऊल ठरावे, ही मनोमन इच्छा...!!

- अविनाश पराडकर, सिंधुदुर्ग
 94229 57575

          
    

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.