भक्तांच्या कल्याणार्थ अधिवास करणारी वडाचापाट गावची आदिशक्ती श्री देवी शांतादुर्गा
भारतीय संस्कृतीत हिंदू देव- देवतांना अनन्यसाधारण असे महत्व आहे.याला कारण म्हणजे श्रद्धा ! ज्या ठिकाणी श्रद्धेला सुरूवात होते नकळत त्याच ठिकाणी परमेश्वराची उत्पत्ती होते. कुणी मानो या न मानो मात्र या विचारावर श्रद्धावान मंडळीं ठाम असतात आणि म्हणूनच श्रद्धेतूनच परमेश्वराची निर्मिती होते. मालवणी मुलुखात तर परमेश्वराची स्थाने तर जागोजागी आढळतात कधी ती दगडा धोंड्यात असतात तर कधी पाना फुलात... कधी झाडापेडात प्रत्येक चराचरात परमेश्वर हा दडलेला आहे हा मालवणी मुलखातील श्रद्धावान मंडळींचा दृढ विश्वास आहे, आणि मग परमेश्वरावर विश्वास ठेवणारी मंडळी संकटाच्या वेळी म्हणा, अथवा अडीअडचणीच्या वेळी म्हणा, परमेश्वराला हाक देतात आणि या हाकेतूनच मिळालेल्या प्रतिसादातून जो मार्ग सापडतो तो समृद्धीचा असतो... हा मार्ग दाखविणारा ईश एकच असतो, रूपे अनेक असली तरी सांगाती मात्र एकच असतो कधी तो रवळनाथ बनतो... कधी रामेश्वर तर कधी वेताळ .. एव्हढंच कशाला ...कधी ती सातेरी, दुर्गा, भराडी, भवानी ...हो अगदी आदिशक्ती आदिमाया शांतादुर्गा बनून समृद्ध जीवनाचा मार्ग दाखवीत असते अशीच आदिशक्ती... आदिमाया... शांतादुर्गा ही भक्तांच्या कल्याणार्थ वडाचापाट गावात जगन्माता बनून अधिवास करत आहे.
मालवण पासून १७ किलोमीटर अंतरावर वसलेल्या निसर्गरम्य वडाचापाट गावात अतिप्राचीन आणि जागृत असे स्वयंभू श्री शांतादुर्गा देवीचे मंदिर आहे. चारही बाजूने डोंगर, हिरवीगार वनराई आणि पाटातून झुळझुळ वाहणारे पाणी यामुळे या गावाला वडाचा पाट हे नाव पडले असावे असे वाटते. या देवीच्या मंदिराच्या शेजारी कोकणातील एकमेव असे लज्जागौरीचे मंदिर असून हे मंदिर खास स्त्रियांचे मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराबरोबरच रवळनाथ मंदिर, लिंगेश्वर मंदिर, श्री देव क्षेत्रफळ, श्री ब्राह्मणदेव मंदिर, श्री देवी शांतादुर्गा देवी सभामंडप, श्री भेरादेव, श्री बेळादेव, गणेश मंदिर, कुलदेवता मंदिर, श्री निमादेव, श्री दत्त मंदिर आदी मंदिरे आहेत. मंदिराच्या पाठीमागील भागात देवीची बारमाही पाण्याची तळी असून या तळीतील पाण्याचा उपयोग देवीच्या स्नानासाठी, केवळ पिण्यासाठी तसेच पूजा पाठासाठी केला जातो. या तळीतील पाण्याचा पाझर देवीच्या पाषाणाच्या खालून गेला असून देवीचे पाषाण पाण्याने ओले झालेले असते.
भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून श्री देवी शांतादुर्गाचा उल्लेख केला जातो. मालवणी मुलखात बहुतांश देवस्थानांबाबत ज्या आख्यायिका प्रचलित आहेत तशाच प्रकारची आख्यायिका श्री देवी शांतादुर्गा देवस्थानाबद्दलची ऐकावयास मिळते. फार वर्षांपूर्वी वडाचापाट गावात सत्वशिल गुराखी होऊन गेला. गाई, गुरे रानात चरावयास नेई. हा त्याचा नित्यक्रम होता. एके दिवशी त्याच्या लक्षात आले की, कळपातील एक गाय नाहीशी होते व संध्याकाळी जाताना ती कळपाबरोबर येते आणि घरी आल्यावर गाय दूध देत नाही म्हणून बेचैन होत असे. तेव्हा त्याने गाईवरती पाळत ठेवली असता त्याला असे आढळून आले की, सदर गाय एका ठराविक ठिकाणी पान्हा सोडते (दुधाचा अभिषेक). त्यानंतर त्यानेप इतरत्र चौकशी केली पण योग्य उत्तर मिळाले नाही, परंतु एके दिवशी त्याला दृष्टांत झाला, "मी या ठिकाणी वास्तव्य करून आहे. माझी स्थापना करा." त्याप्रमाणे त्याने गावातील समस्त पालव समाजाला बरोबर घेऊन त्या ठिकाणची झाडे झुडपे साफ केली. पण साफ करता करता एक घाव चुकून तेथील शिळेवर पडला व त्यातून लाल द्रव बाहेर पडू लागला. साहजिकच तेथेच शिळेची क्षमा मागून तात्पुरती देवीची स्थापना करण्यात आली.
कोकणात सर्वसाधारणपणे देवदेवतांच्या जत्रा या एका दिवसाच्या फार फार तर दीड दिवसाच्या असतात. मात्र वडाचापाट च्या श्री देवी शांतादुर्गा देवीची यात्रा ही पाच दिवसांची असल्याने सिंधुदुर्गात ती लक्षवेधी ठरली आहे. या देवीच्या जत्रोत्सवास पौष पौर्णिमेला प्रारंभ होतो. जत्रेच्या पहिल्या दिवशी देवीला जलाभिषेक केला जातो. तिसऱ्या दिवशी श्री सप्तशती महायज्ञ व महाप्रसादाची प्रथा आहे. यावेळी स्वयंभू पाषाण मुखी देवीस मुखवटा चढविण्यात येतो. व देवीला वस्त्रे परिधान केली जातात. तसेच पूजा अर्चा झाल्यावर देवीची रात्री पालखी प्रदक्षिणा काढली जाते. ज्या ग्रामस्थानी उपवास धरलेला असतो ते दिवटीवर तेल सोडून उपवास सोडतात. अशाच प्रकारचा पालखी प्रदक्षिणेचा कार्यक्रम जत्रोत्सवाच्या तिसऱ्या व पाचव्या दिवशीही होतो. जत्रोत्सवाच्या काळात प्रत्येक घरातून गोळा केलेला मूठभर तांदळापासून देवीचा नैवेद्य तयार करून तो देवीस प्रसाद म्हणून दाखविला जातो. व शिल्लक प्रसाद भाविकांना महाप्रसाद म्हणून वाटला जातो.
श्री शांतादुर्गा देवीचा जत्रोत्सव हा विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कार्यक्रमांनी साजरा केला जातो. या मंदिराचे धार्मिक उत्सव आणि जत्रोत्सव निर्विघ्नपणे पार पडावेत यासाठी वडाचापाट ग्रामविकास मंडळ मुंबईचे योगदान मोलाचे आहे. या मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ एक दिलाने आणि एक मताने गावच्या विकासासाठी झटत असतात.