अवघेचि शब्दच दत्त

श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे म्हटलेले आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. अशा गुरूचांही जो गुरू तो श्रीदत्त गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. गुरू हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो. श्रीदत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. म्हणूनच दत्तजयंती किंवा दत्तजन्मोत्सव हा फक्त गावच्या मंदिरातला नाही तर आपल्या संस्कृतीत उत्साहाचा एक उपास्यबिंदु होतो.

दत्तजयंतीच्या निमित्ताने कोकणातील दोन प्रतिभाशाली साहित्यिकांच्या दोन दत्तभक्तीकाव्यांची आवर्जून दखल घेणे गरजेचे आहे. शब्दाला व्याकरण असते आणि व्याकरणातही एक नाद असतो यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे गझलकार गोविंद नाईक आणि प्रासादिक काव्य लेखनातील आजघडीचे आघाडीचे नाव जयंत रेवडेकर यांच्या या दोन कविता आहेत. साहित्यप्रांतात मुशाफिरी करणाऱ्या भटक्यांना हे अध्यात्मिक लेखन नक्की तल्लीन करेल !

गिरनारी लागली समाधी विश्वनियंत्याची 
दत्त दिगंबर नाम आळवित अवतरली प्राची !! धृ !! 

श्वान जागले चार दिशांचे धेनू हंबरली 
सुवर्णकिरणी साज लेऊनी गिरीशिखरे नटली 
लखलख करुनी सचैल न्हाली पाती त्रिशुळाची !! 1 !! 

शंख , चक्र , डमरू , कमंडलू स्थिरावले हाती 
भस्म उटी , रुद्राक्षमण्यांनी आभूषित छाती 
व्याघ्रचर्म , सोवळे वाढावी शोभा देहाची !! 2 !! 

चंद्रकोर बैसली जटेवर , चंदन लल्लाटी 
दवबिंदू घेऊन प्रकटले पंचामृत वाटी 
पहाटवारा आरती गातो सद्गुरूरायाची !! 3 !! 

गोविंद नाईक....

गोविंद नाईक यांनी या काव्यरचनेत गिरनारची अलौकिकता उलगडली आहे..तर दत्त हा आत्मचित्त शांतीकडे नेणारा एक विचार आहे हे सांगणारे जयंत रेवडेकर यांचे काव्यही तेवढेच अप्रतिम आहे.


दत्त दत्त वाचे स्मरा दत्त नाम ह्रदयी धरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥धृ॥

दत्त गावा दत्त पहावा दत्त मनी साठवा
दत्त येई ऐकुनी धावा दत्त नाम आठवा
त्रैलोकी या व्यापुनी उरला दत्त चराचरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥१॥

दत्त शांती दत्त अनुभुती दत्त देई प्रचिती
दत्त आरती गाता गाता वेद चारी डोलती
दत्त नाम गाता चुकतो जन्म मरण फेरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥२॥

ब्रह्मानंदी लागे ध्यान दत्त दत्त बोले मन
दत्त चरणी तल्लीन दत्त मुर्ती समाधान
उठता बसता वाचे वदता दत्त दत्त स्मरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥३॥

जयंत रेवडेकर


त्रिगुणात्मक रूप देखीले मी याची डोळा
मन मंदिरात भरला दत्त नामाचा सोहळा

ह्रदयास लागले हो माझ्या सुखाचे तोरण
दत्ता पायी सुख वाटे मज सोडु नये चरण

केली हाताची पालखी मिरवली चराचरी
मन होऊनी पादुका माझे दत्त चरण धरी

डोळ्यांच्या वातीनी मी पेटवीले निरांजन
दत्त भक्तीचे जळे तेल भरे मुक्तीचे रांजन

ऐसा देखीला मी दत्त त्यासी जोडले कर
धन्य धन्य झाला जन्म सुख पदरी अपार

जयंत रेवडेकर.


© शब्दसिंधु


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.