भाविका रे.. वारा वाहे रे !

मर्यादा ह्या तिथंपर्यंतच असतात जिथपर्यंत त्या तुम्ही मानता. त्याच मर्यादांच्या पलीकडे एक धाडस नावाची गोष्ट असते. तुमच्यातील प्रामाणिकतापणा ज्यावेळी त्या धाडसाला स्पर्श करते त्याचवेळी या नभांगणातला एक तारा फक्त तुमच्यासाठी लखलखतो. दशावतारी कलेसारख्या निष्काम रंगयोगीजनांच्या या कलेत एक छोटी मुलगी पखवाज वादक म्हणून स्वतःला सिद्ध करतेय. तिचे हे धाडस या कलेला नव्या पिढीसोबत जोडण्यास नक्कीच प्रेरणादायी ठरेल.


आजघडीला भाविका खानोलकर ही सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध झालेली मुलगी बनलीय. दशावतार म्हणजे तळकोकणची स्वतःची वेगळी ओळख. याच दशावतार कलेत अवघ्या १८ वर्षीय खानोलीच्या भाविकाने वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. दशावताराच्या इतिहासात प्रथमच एक “स्त्री पखवाज वादक” म्हणून तिने आपली “एन्ट्री” घेतली आहे. सद्यस्थितीत नाट्य प्रयोगातील संगीत साथीचे तिचे व्हीडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतायत.

तत्कालीन प्रथा परंपरा आणि मर्यादा यामुळे दशावतारात स्त्री सहभाग हा कमी असायचा. पण बदलत्या काळाबरोबर झालेले काही प्रयोगही रसिकांनी तेवढ्याच तन्मयतेने स्वीकारले. अनेक महिला कलावंतांनी सादर केलेल्या दशावताराचेही कौतुकही झाले. 

दशावतारी कलेच्या सातत्याने नाविन्याकडे झुकत असलेल्या वेगवेगळ्या प्रयोगामुळे ही कला नेहमीच बहरत असते. वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली येथिल गौतमेश्वर दशावतार मंडळाच्या माध्यमातून भाविका खानोलकर हिने निवडलेली वाट वेगळी आहे.


दशावताराच्या इतिहासात ती पहिलीच “स्त्री” पखवाज वादक ठरली आहे. कु.भाविका लक्ष्मण खानोलकर ही सद्ध्या वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूल व गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीत शिकत आहे. दरम्यान तिने चार वर्षांपूर्वी येथील चिंतामणी संगीत विद्यालयात पखवाज वादनाचे धडे घेण्यास सुरुवात केली. पखवाज विशारद निलेश पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने वादन कला आत्मसात केली. ती पखवाज वादनाच्या तीन परीक्षाही उत्तीर्ण झाली आहे. दरम्यान भजन कलेतून आपली पखवाज वादनाची आवड जोपासत असतानाच तिने नुकतीच दशावतार नाट्य प्रयोगाला संगीत साथ दिली, आणि व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंच्या माध्यमातून सर्वांचीच वाहवा मिळवली आहे..

भाविकांच्या निमित्ताने सुरु झालेला हा नवा प्रवाह या रंगकलेला युवापिढीला आणखी प्रेरणादायी करणारा ठरो याच नादमयी सदिच्छा !

रंगसिंधु | sindhudurg360°

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.