● जिल्हा बॅंकेसाठी 98.67 टक्के मतदान
● 19 संचालक पदासाठी 39 उमेदवार रिंगणात
● 981 पैकी 968 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि भाजप राणे कुटुंबीयांसह महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या बनविलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी आज 98.67 टक्के मतदान झाले. 981 पैकी 968 मतदारांनी हक्क बजावत 19 संचालक पदासाठी रिंगणात असलेल्या 39 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले.
● असे झाले मतदान
सिंधुदुर्ग जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणुकीसाठी आठही तालुका तहसील कार्यालयात मतदान केंद्र ठेवण्यात आली होती. मतदानासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या निवडणुकीत जिल्हा बँकेवर मतदानद्वारे 19 संचालक निवडून द्यायचे होते, त्यासाठी 981 मतदार निश्चित झाले होते. 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात होते. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व अपक्ष ही महाविकास आघाडी समृद्धी विकास पॅनेल म्हणून निवडणूक रिंगणात होते. त्यांच्या विरोधात भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक परिवर्तन पॅनेल उभे होते. दोन्ही बाजूकडून निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही पॅनेलने तगडे उमेदवार देत एकमेकांसमोर तगडे आवाहन उभे केले होते.
● अटीतटीची लढत
जिल्हा बँक निवडणुकीत आठ तालुका मतदार संघातून आठ संचालक निवडून द्यायचे आहेत. यासाठी प्रमुख लढती अशा होत्या.
◆ कणकवलीमध्ये शिवसेनेकडून विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत विरोधात भाजपचे विठ्ठल देसाई,
◆देवगड तालुक्यात महाविकास आघाडीकडून अपक्ष अविनाश माणगांवकर विरुद्ध भाजपचे प्रकाश बोडस
◆ वैभववाडी तालुक्यात सेनेचे दिगंबर पाटील विरुद्ध भाजपचे मोहन रावराणे,
◆मालवण तालुक्यात राष्ट्रवादीचे व्हिक्टर डांटस विरुद्ध भाजपचे कमलाकांत कुबल,
◆कुडाळ तालुक्यात काँग्रेसचे विद्याप्रसाद बांदेकर विरुद्ध भाजपचे प्रकाश मोर्ये व भाजप बंडखोर सुभाष मंडव,
◆वेंगुर्ले तालुक्यात काँग्रेसचे विलास गावडे विरुद्ध भाजपचे मनीष दळवी,
◆सावंतवाडी शिवसेनेचे विद्याधर परब विरुद्ध भाजपचे गुरुनाथ पेडणेकर,
◆दोडामार्ग सेनेचे गणपत देसाई विरुद्ध भाजपचे प्रकाश गवस
या व्यतिरिक्त जिल्हास्तर अकरा मतदारसंघातील लढतीही लक्षवेधी ठरल्या.
◆ पतसंस्था मतदार संघातून शिवसेनेचे सुशांत नाईक विरुद्ध भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली,
◆पणन मतदार संघातून राष्ट्रवादीचे सुरेश दळवी विरुद्ध भाजपचे अतुल काळसेकर,
◆मजूर-औद्योगिक मतदार संघातून सेनेचे लक्ष्मण आंगणे विरुद्ध भाजपचे गजानन गावडे,
◆मच्छीमार आणि दुग्धसंस्था मतदार संघातून राष्ट्रवादीचे मधुसूदन गावडे विरुद्ध भाजपचे महेश सारंग,
◆घर बांधणी देखरेख संस्थेतून राष्ट्रवादीचे विनोद मर्गज विरुद्ध भाजपचे संदीप परब,
◆वैयक्तिक मतदार संघातून काँग्रेसचे विकास सावंत विरुद्ध भाजपचे समीर सावंत,
◆दोन महिला प्रतिनिधी मतदार संघातून सेनेच्या अनारोजीन लोबो व काँग्रेसच्या नीता राणे विरुद्ध भाजपच्या अस्मिता बांदेकर व प्रज्ञा ढवण
◆अनुसूचित जाती मतदार संघातून राष्ट्रवादीचे आत्माराम ओटवणेकर विरुद्ध भाजपचे सुरेश चौकेकर,
◆इतर मागास मतदार संघातून सेनेचे मनीष पारकर विरुद्ध भाजपचे रवींद्र मंडगांवकर,
◆विमुक्त-भटक्या जमाती मतदार संघातून काँग्रेसचे मेघनाथ धुरी विरुद्ध भाजपचे गुलाबराव चव्हाण
◆ मतदार राजाचा कौल ठरणार निर्णायक
जिल्हा बँक निवडणुकीत 981 पैकी 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये मालवण, कुडाळ, दोडामार्ग या तीन तालुक्यांत 100 टक्के मतदान झाले आहे. तर सावंतवाडी 99.52 टक्के, वेंगुर्ले 94.79 टक्के, कणकवली 97.57 टक्के, वैभववाडी 54.53 टक्के, देवगड 83.81 टक्के असे तालुकानिहाय मतदान झाले आहे.
● तेरा जणांची मतदानाला गैरहजेरी
981 पैकी 968 मतदारांनी मतदान केले.13 मतदार मतदान करण्यासाठी आले नाहीत. यात वेंगुर्ले पाच, कणकवली चार, वैभववाडी एक, देवगड दोन आणि सावंतवाडी एक अशाप्रकारे मतदार आले नाहीत.