● फोंडाघाट येथील तेजस चव्हाणचे सुयश
● एमपीएससी परीक्षेत तेजस चव्हाणची यशपताका
जिल्ह्यातील फोंडाघाट येथील तेजस सूर्यकांत चव्हाण याने एमपीएससी परीक्षेत स्पृहणीय सुयश मिळवून जिल्ह्याचे आणि आपल्या गावचे नाव उज्ज्वल केले आहे. तेजस हा फोंडाघाट केंद्राचे केंद्रप्रमुख सूर्यकांत चव्हाण यांचा मुलगा असून त्याची आई सौ.सुप्रिया चव्हाण या गृहिणी आहेत.
तेजस चव्हाण याने पुणे येथे कृषी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावर एमपीएससी परीक्षा देऊन तो पहिल्याच प्रयत्नात उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला.विशेष म्हणजे त्याने कोणताही खाजगी क्लास न करता हे दैदिप्यमान सुयश मिळवले आहे. त्याची नियुक्ती कृषी उप संचालक (वर्ग-१) या पदावर यवतमाळ येथे झाली असून तो लवकरच तेथे पदभार स्वीकारणार आहे.
तेजसच्या या यशामागे त्याचे कठोर परिश्रम आहेतच शिवाय आई वडीलांचे प्रोत्साहन आणि त्याचे काका निळेली कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.अशोककुमार चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाल्याने तो हे सुयश मिळवू शकला. शालेय जीवनापासूनच अतिशय हुशार असलेल्या तेजसने शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर अग्रेसर राहून यश मिळवले आहे. भविष्यात पीएचडी करून भारतीय प्रशासनात सर्वोच्च अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे त्याचे ध्येय आहे.तेजसच्या या सुयशाबद्दल त्याचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.