नमावे भीमास, स्मरावे कृष्णास !

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात लिहिते झालेल्या आणि पुढे मराठीतील महत्त्वाचे चरित्रलेखक म्हणून प्रसिद्ध पावलेल्या कृष्णराव अर्जुन केळूसकर यांच्याबद्दल स्मरण करणे ही आज काळाची अतीव गरज आहे. शिवछत्रपती आणि गौतम बुद्ध यांच्या चरित्रलेखनातुन समाजाला दिशा देण्याचे एक मोठे काम कृष्णराव केळुसकर यांनी केले.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या तालुक्यातील केळुस या गावी जन्मलेले कृष्णराव अर्जुन केळुसकर हे मराठीतील आद्य शिवचरित्रकार अशी नोंद मराठी सारस्वतजनानी आवर्जून नोंदवली आहे. कृष्णराव केळूसकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचेही पहिले समग्र चरित्र- ‘क्षत्रियकुलावतंस छत्रपति शिवाजी महाराज यांचें चरित्र’- १९०७ साली प्रसिद्ध केले. 


शिवचरित्रानंतर पुढे १८९८ साली केळूसकर यांनी लिहिलेले गौतम बुद्धांचे चरित्र प्रकाशित झाले. हे चरित्रच डॉ. आंबेडकरांना प्रेरणा देणारे ठरले. 

केळुसकर यांनी लिहिलेले गौतम बुद्ध यांचे चरित्र हे मराठी भाषा संपन्नतेची एक अप्रतिम ओळख आहे.

‘‘.. उपनिषत्कालास आरंभ होऊन बुद्धाच्या आगमनापर्यंत स्वतंत्र विचार करणारे लोक पुष्कळ झाले होते. त्यांनी आपापल्या बुद्धीच्या व विचारशक्तीच्या मगदुराप्रमाणे निरनिराळे तत्त्वविचार व धर्मविचार स्वशिष्यांद्वारे त्या काळच्या लोकांत प्रचलित केले होते. उपनिषत्कालानंतर जे मोठमोठे तत्त्वविचार करणारे जन झाले ते बहुतेक असे म्हणत की, आपल्या विचारास उपनिषदांचा आधार आहे आणि हे त्याचे म्हणणे खोटे नसे. कारण उपनिषत्काली सर्व प्रकारचे धर्मविचार व तत्त्वविचार बीजरूपाने किंवा विस्तरत: होऊन चुकले होते. तेव्हा प्रत्येकाने आपल्या मताला उपनिषदग्रंथाचा आधार आहे असे प्रतिपादन करून स्वाभिमत विचारांकडे जनप्रवृत्ती करण्यास फारशी पंचाईत नसे. हल्ली जशी उपलब्ध असलेली सर्व उपनिषदे पाहिजे त्यास सामग्रे करून अवलोकन करावयास मिळणे शक्य झाले आहे तसा काहीच प्रकार पुरातन काळी नसल्यामुळे हा असा घोटाळा वारंवार होत असे. यामुळे परस्परविरोधात्मक मतांचा पुरस्कार व प्रसार, सर्वास पूज्य व मान्य असे जे उपनिषद ग्रंथ त्यांच्या आधाराने होत असे आणि या विरोधाची मीमांसा करणे त्या काळी बरेच अशक्य असल्यामुळे ‘धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनोयेन गत: स पंथ:’ अशी तोड सामान्य जनास काढावी लागत असे. याप्रमाणे जे वाटतील ते विचार जनात प्रसिद्ध करण्याची मोकळीक असल्यामुळे आर्यावर्तात त्याकाळी अनेक धर्मग्रंथ व तत्त्वविचारपद्धती निर्माण झाल्या. बौद्ध धर्म हा अशांपैकीच एक होय. बुद्धाचे म्हणणे असे की, चालू असलेले यज्ञयागादिकांचे शुष्क कर्मकांड केवळ निर्थक व अप्रयोजक असून, पुरातन व खरा कैवल्यप्रद जो धर्ममार्ग त्याकडे जनांची प्रवृत्ती होणे इष्ट आहे आणि सांप्रत जी बुद्ध धर्माची मूळची मते उपलब्ध आहेत त्यातील बहुतेकांस उपनिषदांचा आधार आहे. यावरून पाहता बुद्धमत हे काही तरी नवीनच बंड नसून आमच्या पुरातन अगणित धर्मविचारांपैकी व तत्त्वविचारांपैकी काहीकांचे मंडन करणारे होते असे म्हणावे लागते. तरी वेदाविषयी बुद्धाच्या मनात आदरबुद्धी मुळीच नव्हती.’’

कृष्णराव अर्जुन केळुसकर म्हणजे थोर चरित्रकार यांच्या शब्दात 'ऋषीतुल्य प्रज्ञावंत' अशी सार्थ ओळख आहे. कृष्णराव केळुसकर यांनी ६ ऑक्टोबर, १९३४ रोजी मुंबईत भरलेल्या पहिल्या मुंबई मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. प्रचंड लेखनसंपदा असणाऱ्या केळुसकर यांनी आपल्या लेखनातून समाजाला बोधप्रद असे लिखाण केलं आहे. कृष्णराव केळुसकर यांच्या या शब्दसंपदेला आज प्रत्येकानेच पुन्हा वाचण्याची गरज आहे.

स्मरणसिंधु | sindhudurg360°
◆◆◆◆

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.