● महिला बचत गटांमार्फत शाळांना धान्य वितरण
● राज्य सरकारचे परिपत्रक जारी
शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शाळांना करण्यात येणाऱ्या धान्य वाटपाचे काम आता महिला बचतगटांवर सोपविण्यात आले आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नुकतेच याबाबतचे परिपत्रक जारी केले..
कोरोनामुळे शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देता येत नाही. त्यामुळे आहार खर्च मर्यादेत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून, त्यामुळे महिला बचतगट व संस्थांना आर्थिक उभारी मिळणार आहे.
● सरकारच्या निर्णयामुळे 4 हजार महिलांचा फायदा
शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 240 ते 250 कोटी रुपयांच्या धान्याचे वाटप करण्याचे काम महिला बचत गट, संस्थांना मिळणार आहे. त्याचा राज्यातील 48 महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील सुमारे 370 महिला बचतगट व संस्थांमार्फत कार्यरत असणाऱ्या 4 हजार महिलांना फायदा होणार आहे.
अनेक महिला बचत गटांनी बॅंकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. मात्र, कोरोनामुळे महिला बचत गटांच्या हाताला काम राहिले नव्हते. रोजगार नसल्याने महिला बचतगट व संस्था आर्थिक अडचणीत आल्या होत्या. मात्र, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे बचतगटांना आर्थिक उभारी मिळणार आहे.