● धुंधुरमास आख्यान
वसंत, ग्रीष्म, वर्षा ऋतू ही देवीची रूपे आहेत, तर शरद, हेमंत, शिशिर ही देवांची रूपे मानली जातात. शिशिरात कडाक्याची थंडी पडते. दिवस छोटा होऊ लागतो. सकाळी धुक्याची चादर आणि सायंकाळी मिट्ट अंधार. अशात सूर्याचे कोवळे ऊन फार उबदार वाटते. पानाफुलांवरून दवाचे थेंब ओघळू लागतात. पानगळीचा मौसम सुरू झालेला असला, तरीदेखील धरित्री जणू काही जीर्ण वस्त्र टाकून नवयौवनेप्रमाणे तजेलदार भासू लागते. निसर्गाची ही कूसबदल म्हणजेच धुंधुर मास!
सूर्य धनु राशित प्रवेश करतो तेथून सुर्य मकर राशीत प्रवेश करतो तोपर्यंतचा काळ हा धनुर्मास म्हणून ओळखला जातो. यास धुंधुरमास असेही म्हणतात. याला धुंधुरमासाबरोबर झुंझुरमास अथवा शून्यमास असेही म्हणतात.
असे म्हणतात की दक्षिणायनाचे सहा महिने देवतांची रात्र असते व उत्तराणायचे सहा महिने देवतांचा दिवस असतो आणि हा धुंधुरमास देवतांचा ब्रह्ममुहूर्त म्हणजेच त्यांची पहाट असते. या मासात लग्नकार्ये, प्रॉपर्टी खरेदी इत्यादी शुभकार्ये करत नाहीत. हा संपूर्ण महिना आपल्या देव देवतांचे प्रती अर्पण असतो.
सूर्योदयापूर्वी भल्या पहाटे ०४ ते ०६ या ब्रम्हमुहूर्तात उठून स्नान करून देवाची पूजाअर्चा, आराधना, भजन अशी आपापल्या परीने भक्ती करतात. या मासात विशेषकरून भगवान विष्णूची व श्रीकृष्णाची आराधना करतात. तसेच वसुंधरेला व चराचराला जीवन व आरोग्य प्रदान करणारी प्रत्यक्ष देवता सूर्याची आराधना केली जाते. या आरतीला काकड आरती असे म्हणतात.
या वर्षीचा धुंधुर मास १९ डिसेंबर २०२१ ला सुरु झालाय. इंग्रजी किंवा मराठी कॅलेंडर मध्ये या महिन्याचा स्वतंत्र उल्लेख जरी केलेला नसला तरी या धुंधुरमास महिन्याला अनन्य साधारण महत्व असून हा हेमंत व शिशिर ऋतु मध्ये येतो. मराठी महिन्यानुसार मार्गशीर्ष व पौष मध्ये व इंग्रजी महिन्या नुसार डिसेंबर मध्यापासून जानेवारी मध्यापर्यंत असतो.
धुंधुरमास इंग्रजी कॅलेंडर मध्ये सापडणार नाहीच. हा प्रकार पूर्वी अधिकाधीक शेतकरी लोक पाळायचे. म्हणजे थंडीच्या दिवसात लवकर सूर्य उगवायच्या सुमारास पूर्ण आवरून शेतात जायचं आणि शेकोटीच्या उबेत मूगाच्या डाळीची खिचडी, बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी/भरीत, कांदा, लोणी किंवा लोणकढं तूप असा बेत जेवायचा. वांगे, लोणी पचायला जड असतं तर बाजरीची भाकरी उष्ण असल्याने थंडीत चालते. खिचडी पचायला हलकी असते म्हणून त्याबरोबर मुगाच्या डाळीची खिचडी असते. शेतात या सुमारास नविन हुर्डा आणि वांगी आलेली असतात. म्हणून वांगी अधिक खपतात, नाहीतर गवार, मटार, गाजर, वांगे अशी मिश्र भाजीही बनवतात.त्याला लेकुरवाळी भाजी असंही म्हणतात.
साधारणपणे थंडीच्या दिवसात जठराग्नी व्यवस्थीत पेटलेला असतो (पावसाळा आणि उन्हाळ्याच्या तुलनेत). त्यामुळे जड पदार्थ खाल्ले तरी सहज पचतात आणि अंगी लागतात. आणि जेवण तसं जास्तही जातं. म्हणूनच थंडीत म्हणजे जानेवारी महिन्यात संक्रांत, भोगी च्या काळात धुंधुरमास करतात. अनेक ठिकाणी धुंधुरमासात गुळाच्या पोळ्याही खातात. त्याही पचायला जड असतात.
गावाजवळील निसर्गरम्य वातावरणात आपल्या मित्र मंडळीना वनभोजनाची तयारी करून एकेदिवशी सकाळी एकत्र बोलवायचे व गप्पांचा फड जमवत थंडीमध्ये पोषक ठरतील, अशा पदार्थांचा आस्वाद घेण्याची पहाटेच्या वनभोजनाची ही प्रथा आता अस्तंगत होत आहे. कालौघात बदलत्या दैनंदिन जीवनशैलीमुळे आपल्याला हा धुंदूर मास साजरा करणे शक्य होत नाही आणि हळूहळू तो विस्मृतीत जाऊ लागला आहे.
हल्ली काही हॉटेल मध्ये या जुन्या पण आजच्या जगातही अत्यंत उपयुक्त अशा पारंपारिक खाद्यसंस्कृतीचा आदर, त्याचा सन्मान करून हा धुंदूर मास साजरा करतात. धुंदूर मासाच्या दरम्यान सकाळी ७ ते ९ मध्ये या हॉटेल मध्ये लिंबू-मध पाणी, बोरन्हाणमधील चुरमुरे, रेवडी, बोरं, हरभरा, पातळ मऊ भात सोबत तूप आणि मेतकुट, क्रश कुरडई, लिंबाचे लोणचे, ज्वारी-बाजरी थालीपीठ, लोणी, आंबोळी, लसूण दही चटणी, तीळाची साटोरी, दाणे गूळ, ऊसाचे करवे आणि खारीक खीर असा साग्रसंगीत बेत करतात. काही हॉटेल मध्ये हुरर्डा पार्टीचे आयोजन केले जाते.