कोकणचा नवा परिवर्तन अध्याय : कोकण द्रुतगती महामार्ग

● चिर्ले-पत्रादेवी ५०० किलोमीटरसाठी ४ हजार कोटी खर्च येणार

● रेवस-अलिबाग-बाणकोट-जयगड-रत्नागिरी-देवगड-आरोंदामार्गे पत्रादेवीपर्यंत महामार्ग



समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते गोव्यापर्यंत ५०० किलोमीटर लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

शिवडी - न्हावाशेवा सागरी सेतू रायगडमधील ज्या चिर्ले गावात संपतो, तेथून पुढे सागरी भागातून हा कोकण द्रुतगती महामार्ग रेवस, अलिबाग, बाणकोट, जयगड, रत्नागिरी मार्गे देवगड ते पुढे आरोंदा, पत्रादेवीपर्यंत जाणार आहे. ५०० किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी ४ ते ५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू रायगडमधील ज्या चिर्ले येथे संपतो तेथून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेवरील पत्रादेवीपर्यंत ५०० किलोमीटरचा हा कोकण द्रुतगती सागरी महामार्ग असेल. दोन वर्षांपूर्वीच केंद्र सरकारच्या सुचनेवरून रेवस - रेडी सागरी महामार्गासाठी पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्राला या महामार्गाचा ४ हजार कोटींचा विकास आराखडा (डीपीआर) पाठविला होता.त्यानुसार महामार्ग दुपदरीकरणासाठी १० मीटर रुंदीचे डांबरीकरण व दोन्ही बाजुला प्रत्येकी दीड मीटर साईडपट्टी अशा स्वरुपाचा हा आराखडा आहे. 



महाराष्ट्र सरकारने ५०० किमी लांबीच्या कोकणच्या किनारी भागातून ‘हरित कोकण एक्सप्रेस-वे’ प्रकल्प हा आता कोकण विकासासाठी आणि पर्यटन विकासासाठी महत्वाचा दुवा बनणार आहे. हा प्रस्तावित मार्ग एमएमआरडीएच्या शिवडी ते चिर्ले या प्रकल्पाला जोडता येईल. तसेच विरार-अलिबाग मार्गालासुद्धा तो जोडला जाईल. हा नवीन प्रस्तावित मार्ग मुंबई राष्ट्रीय महामार्गाला समांतर असेल. ताशी १२० किमी वेगाने वाहने जाऊ शकतील, अशी या मार्गाची आखणी केली जाईल. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर व सर्व जमिनीचे भूखंड ताब्यात आल्यानंतर हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

हा द्रुतगती मार्ग कोकणच्या किनारी भागातून आखला गेला आहे. त्यामुळे प्रवासात कोकणच्या हरित सृष्टीसौंदर्याचा आस्वाद प्रवाशांना घेता येईलच. शिवायया प्रकल्पामुळे कोकण किनार्‍यावरील पर्यटन उद्योगालाही मोठी चालना मिळू शकते. त्याचबरोबर चाकरमान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजेया प्रकल्पामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. 

या नवीन वाहतूक प्रकल्पामुळे कोकणच्या विकासात निश्चितच भर पडेल आणि व्यापारीवर्ग कोकणातील काजू व आंबे व इतर उत्पादने आंतराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत नवीन जलद मार्गाने तत्काळ पाठवू शकतील. शिवाय या प्रस्तावित मार्गामुळे स्थानिक लोकांना विविध व्यवसाय व रोजगाराच्या अपरिमित संधी निर्माण होतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.