जय संविधान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला भारताचं संविधान संमत करणारा ठराव २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेनं एकमतानं मंजूर केला. २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान देशात अमलात आलं. संविधानाच्या रूपात लोकशाही शासन पद्धतीनं स्वातंत्र्याच्या जाणिवांना नवा आकार देण्याचं स्वप्न पाहण्यात आलं. खरंतर भारत आणि भारतीयांच्या सर्वांगीण विकासासाठी हे स्वप्न जगणं आणि जागवणं हे प्रत्येक भारतीयाचं आद्यकर्त्यव्य आहे. या कर्तव्याचं पालन करण्याची शपथ आज संविधान दिन साजरा करताना प्रत्येक भारतीयानं घ्यायला हवी.

संविधानानं आपल्याला अनेक मूलभूत अधिकार दिले...  जीवन जगण्याचा अधिकार, भाषण, लेखन, विचार स्वातंत्र्य, उपासना स्वातंत्र्य, संचार आणि संघटना स्वातंत्र्य इत्यादी अधिकार आपल्याला मिळाले... शिकण्याचं, बोलण्याचं, संपत्ती संचयाचं मूलभूत स्वातंत्र्य याच संविधानानं भारतीयांना बहाल केलं. अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मूलभूत गरजांची पूर्तता व्हावी यासाठीचा विचार दिला. जगण्याची अन् समानतेच्या तत्त्वावर जगवण्याची निखळ दृष्टी दिली. 

भारताच्या संविधानाबद्दल काही प्रमुख गोष्टी

◆भारताचे संविधान ब्रिटन, आयर्लंड, जपान, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांच्यासह अन्य देशांच्या मसुद्यांनी प्रेरित आहे.

◆भारताच्या संविधान सभेची स्थापना १९४६ मध्ये झाली. या सभेचे कामकाज २ वर्ष ११ महिने, १८ दिवस यात सामावलेले १६६ दिवस सुरू होते.

◆भारताचे संविधान एक हस्तलिखित दस्तावेज आहे. हा जगातील सर्वात मोठ्या हस्तलिखित दस्तावेजांपैकी एक आहे. मूळ इंग्रजी मसुद्यात १ लाख १७ हजार ३६९ शब्द आहेत.

◆भारताच्या मूळ संविधानात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांचा प्रस्तावनेत थेट उल्लेख नव्हता. पण ४२व्या घटनादुरुस्तीद्वारे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांचा थेट समावेश केला. प्रस्तावनेत १९७६ मध्ये ही घटनादुरुस्ती झाली. प्रस्तावनेत आतापर्यंत झालेली ही एकमेव घटनादुरुस्ती आहे.

◆भारतीय संविधानाची मूळ संरचना भारत सरकार अधिनियम १९३५ वर आधारित आहे.

◆भारतीय संविधानाची मूळ हस्तलिखित प्रत आजही संसदेच्या पुस्तकालयात उपलब्ध आहे.

◆भारताच्या संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाच्या मुसद्याला मंजुरी दिली. ही मंजुरी मिळताच जयजयकार, जयघोष, बाक वाजवणे या पद्धतीने संविधान सभेच्या सदस्यांनी आनंद साजरा केला.

◆संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधानाच्या मसुद्याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव सादर केला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. गांधीविचारांनी हा एक अनोखा विजय मिळवल्याचे ते म्हणाले.

◆संविधानाच्या मसुद्याला मंजुरी मिळाल्यानंतर जण-गण-मन झाले आणि संविधान सभेचे त्या दिवशीचे कामकाज संपले. स्वातंत्र्यसैनिक पूर्णिमा बॅनर्जी यांनी जण-गण-मन हे राष्ट्रगीत गायले.

◆संविधानातील तरतुदीनुसार सभागृहाने २४ जानेवारी १९५० रोजी देशाच्या पहिल्या राष्ट्रपतींची निवड झाली. एका विशेष अधिवेशनात संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले.



संविधानातून लोकशाही, समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घडवण्याचा निर्धार आता नव्यानं करायला हवा. त्यासाठी नुसता संविधान दिन साजरा करून चालणार नाही तर भारताची भावी पिढी असलेल्या मुलांना संविधान समजून सांगायला हवं. किंबहुना ते त्यांच्या आणि आपल्याही मनावर खोलवर बिंबवून घ्यायला हवं. हीच आजच्या संविधान दिनी नवक्रांतीची सुरुवात ठरेल. संविधान खऱ्या अर्थी चिरायू होईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.